एपी, काबूल
पूर्व अफगाणिस्तानात रविवारी रात्री आलेल्या भूकंपामुळे सुमारे ८०० जणांचा मृत्यू झाला असून २,५००पेक्षा जास्त व्यक्ती जखमी झाल्या आहेत अशी माहिती तेथील तालिबान सरकारने सोमवारी दिली. जीवितहानीचा आकडा वाढण्याची भीतीही सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.० इतकी मोजली गेली. भूकंपाचे केंद्र नंगरहार प्रांतामध्ये असले तरी त्याचा फटका कुनार प्रांतामधील अनेक गावांना बसला अशी माहिती देण्यात आली.
रविवारी रात्री ११.४७ वाजता झालेल्या या भूकंपाचे केंद्र नंगरहार प्रांतामधील जलालबाद शहरापासून २७ किलोमीटर दूर, भूपृष्ठभागाखाली केवळ ८ किलोमीटर खोल होते अशी माहिती ‘यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे’ने दिली. भूकंपाचे केंद्र उथळ असल्याने त्यामुळे अधिक नुकसान झाले. हा सर्व भाग डोंगराळ आहे. भूकंपानंतर अनेक लहानमोठे धक्के बसत होते. त्यामध्ये अनेक इमारती कोसळल्या. जखमींना हेलिकॉप्टरने उपचारासाठी हलवण्यात आले.
भूकंपातून वाचलेले लोक रात्रभर ढिगाऱ्याखाली बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत होते. अनेक जण हातानेच खोदकाम करत होते. कुनार प्रांतामधील नुरगाल जिल्ह्यात एका रहिवाशाने सांगितले की त्याचे संपूर्ण गाव भूकंपात नष्ट झाले आहे. अनेक लहान मुले, वृद्ध आणि तरुण ढिगाऱ्याखाली असून या भागात मदतीची गरज असल्याची माहिती त्याने दिली. भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू असून कुनार, नंगरहार आणि काबूलमधून वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शराफत झमान यांनी दिली. मृत आणि जखमींची संख्या बदलण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले.
जणू पर्वतच हलत होता!
नुरगालच्या माझा डारा भागातील सादिकउल्ला याने सांगितले की, तो झोपेत असताना भूकंपामुळे त्याला जाग आली. संपूर्ण पर्वत हलत असल्यासारखे वाटत होते. आधी त्याने त्याच्या झोपलेल्या तीन मुलांना बाहेर काढले आणि वाचवले. त्यानंतर तो कुटुंबातील इतर सदस्यांना वाचवण्यासाठी गेला असता त्याच्यावर ढिगारा कोसळला आणि तो अडकला. तो म्हणाला की, “माझी पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आणि माझे वडील जखमी झाले. मी ढिगाऱ्याखाली अर्धा बुडालो होतो आणि मला बाहेर पडता येत नव्हते. आम्ही तीन ते चार तास अडकलो होते. दुसऱ्या भागातील लोकांनी येऊन माझी सुटका केली.”
भारताकडून मदतीचा हात
भारताकडून भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला मदत सामग्री पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. भारत शक्य ती सर्व मानवतावादी मदत करायला तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तर, पराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्याबरोबर चर्चा करून अधिक मदतपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.