खलिस्तानी समर्थक आणि वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग आज सकाळीच पोलिसांना शरण गेला. पंजाबमधील मोगा जिल्ह्यात त्याने आत्मसमर्पण केले. पंजाब पोलिसांनीही याप्रकरणी पुष्टी दिली असून त्याला आसाममधील डिब्रुगढ येथील तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांकडून प्रतिक्रिया आली आहे.

अमृतापालच्या आत्मसमपर्णामुळे कुटुंबियांनी निश्वास सोडला आहे. “याप्रकरणातील संदिग्धता संपली आहे. त्यामुळे एक मार्ग मोकळा झाला. आता आम्ही कायदेशीर लढा देणार आहोत”, अशी प्रतिक्रिया त्याचे निकटवर्तीय सुखचैन सिंग यांनी दिली. तसंच, “अमृतपाल फरार असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मोठ्या संकटातून जात होते, हे संकट आता संपले आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >> जर्नेलसिंग भिंद्रनवालेशी तुलना ते दुबईतील वास्तव, आत्मसमर्पण केलेला अमृतपाल सिंग कोण आहे? पोलीस त्याचा शोध का घेत होते?

सुखचैन सिंग हे पंजाब सशस्त्र पोलीस दलातून इन्स्पेक्टर पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला फोनवरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “अमृतपालने आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हे आमच्यासाठी फारसं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं म्हणजे आमच्या मनात असलेली कोंडी आता संपली आहे. त्याच्या समर्थकांप्रमाणे त्यालाही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत डिब्रुगड तुरुंगात पाठवले जाईल. आम्ही आता कायदेशीर लढाई सुरू करू शकतो.”

“नितनाम (सकाळची प्रार्थना) केल्यानंतर, मी टीव्ही सुरू केला. तेव्हा चॅनेलवर अमृतपालच्या अटकेची बातमी आम्हाला मिळाली”, असं सुखचैन म्हणाले. अमृतपालचे एक आणखी एक निकटवर्तीय हरजित सिंग हे आधीपासूनच डिब्रुगढ तुरुंगात आहेत. त्यांच्यावरही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

काहीच दिवसांपूर्वी अमृतपालची बायको किरणदीप कौर हिला विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर लागलीच तीन दिवसांनी पोलिसांनी अमृतपालला अटक केली आहे.

हेही वाचा >> मोठी बातमी! खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग अखेर पंजाब पोलिसांच्या ताब्यात; मोगा येथे केलं आत्मसमर्पण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृतपाल सिंग कोण आहे?

पंजाबातील जल्लूपुर गावातील रहिवासी असलेल्या अमृतपाल सिंगने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. २०१२ साली अमृतपाल सिंग दुबईला गेला होता. तिथे त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. मागील वर्षी शिवसेना नेते सुधीर सूरी खून प्रकरणात अमृतपाल सिंगचे नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला सिंगावाला गावात नजरकैदेत ठेवलं होतं.