जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून चिथावणीखोर वक्तव्यांची मालिकाच सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या हेकेखोरपणामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिली. त्यानंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फोनकरून दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी बोलताना संयम पाळा, अशा शब्दात समज दिली.

जम्मू-काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळपास अर्धातास फोनवर चर्चा केली. या चर्चेवेळी मोदी यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख करणे टाळले. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर तणाव निर्माण होईल अशा पद्धतीनेच भडक विधाने केली जात असल्याचे मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितले. दोन्ही देशांमध्ये क्षेत्रीय शांततेशिवाय द्विपक्षीय मुद्यांवर देखील यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. काही नेत्यांकडून भारताविरोधी भडकाऊ भाषणं केली जात आहेत. ज्यामुळे प्रदेशातील शांततेला बाधा निर्माण होत आहे. अशा वातावरणात सीमेपलिकडच्या दहशतवादाला कोणताही थारा देऊ नये, असे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. आठवडाभरात ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा खान यांच्याशी चर्चा केली. ट्रम्प म्हणाले, जम्मू काश्मीर मुद्यावरून भारता पाकिस्तान यांच्या निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी पाकिस्ताने बोलताना संयम पाळायला हवा, असा सल्ला ट्रम्प यांनी खान यांनी दिला. वाढत चाललेला दुरावा टाळण्यासाठी दोन्ही देशांनी संयम पाळायला हवा, असे ट्रम्प म्हणाले. त्याचबरोबर पाकिस्तान आणि अमेरिकेतील आर्थिक आणि व्यापारी सहकार्य पुढे नेण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला.

यापूर्वीही काश्मीर मुद्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी हे प्रकरण दोन्ही देशांनी करून मिटवावे, असा सल्ला इम्रान खान यांना सल्ला दिला होता. काश्मीर मुद्यावरून पाकिस्तानने टोकाची भूमिका घेतली असून भारतासोबतचे संबंध तोडले आहेत. त्याचबरोबर युद्धाची भाषणाही पाकिस्तानकडून केली जात असल्याने दोन्ही देशातील संबंधात प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे.