धर्म, संस्कृती, नैतिकतेच्या नावाखाली लोकांच्या मनात भीती निर्माण करणे हा दहशतवाद नसेल, तर मग दहशतवाद नेमका काय असतो, असा प्रश्न प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते प्रकाश राज यांनी विचारला आहे. प्रकाश राज यांनी याआधी वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या मुद्द्यावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. यानंतर आता त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. काल (गुरुवारी) अभिनेते कमल हसन यांनी दहशतवादी कृत्यात हिंदू कट्टरपंथीयांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. यानंतर आता प्रकाश राज यांनी दहशतवादावरुन भाजपवर शरसंधान साधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धर्म, संस्कृती, नैतिकतेच्या नावाखाली भीती निर्माण करणाऱ्यांना प्रकाश राज यांनी धारेवर धरले आहे. ‘माझ्या देशात रस्त्यावरुन चालत असलेल्या प्रेमी युगुलासोबत नैतिकतेच्या नावाखाली गैरवर्तन करणे, त्यांना धक्काबुक्की करणे दहशतवाद नसेल… गोहत्येच्या केवळ संशयावरुन कायदा हातात घेऊन लोकांची हत्या करणे दहशतवाद नसेल… थोडा जरी विरोधी सूर ऐकू आल्यास त्या व्यक्तीला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणे दहशतवाद नसेल, तर मग दहशतवाद नेमका काय असतो?,’ असा प्रश्न प्रकाश राज यांनी ट्विट करुन उपस्थित केला आहे.

प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी कालच हिंदू दहशतवादावरुन कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटनांना लक्ष्य केले होते. ‘उजव्या विचारसरणीने आता ‘मसल पावर’चा वापर करण्यास सुरूवात केली आहे. हिंसाचारात त्यांचा सहभाग असून, हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला आहे,’ अशी टीका कमल हसन यांनी तामिळ साप्ताहिक ‘आनंदा विकटन’मध्ये लिहिलेल्या लेखातून केली होती. कमल हसन यांनी केलेली टीका ताजी असतानाच आता प्रकाश राज यांनीही कट्टरतावाद्यांना लक्ष्य केले आहे.

प्रकाश राज यांनी याआधी वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन थेट पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले होते. ‘मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते असून, माझे राष्ट्रीय पुरस्कार हे त्यांनाच देण्यात यावेत,’ असे त्यांनी म्हटले होते. ‘गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेल अथवा नाही, हे माहित नाही. मात्र सोशल मीडियावर असेही काही लोक आहेत जे त्यांच्या हत्येचे समर्थन करत आहेत. हे लोक कोण आहेत आणि त्यांची विचारसरणी काय आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सोशल मीडियावर हत्येचे समर्थन करणाऱ्यांना मोदी फॉलो करतात. याचीच चिंता मला सतावत आहे. आपला देश नेमका कुठे चालला आहे?,’ असे प्रकाश राज यांनी विचारले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After kamal hasan actor prakash raj slams bjp and right wing organisations on terrorism
First published on: 03-11-2017 at 16:35 IST