नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री दिल्लीतील कंझावाला येथे घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. एका २० वर्षीय तरुणीला धडक दिल्यानंतर कार चालकाने दिला सुमारे १२ किलोमीटर फरफटत नेलं आहे. ही घटना ताजी असताना नोएडा येथे या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एका डिलिव्हरी बॉयला कारने धडक दिली असून त्याला जवळपास ५०० मीटर फरफटत नेलं आहे. या दुर्दैवी घटनेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे.
या अपघातानंतर आरोपींना संबंधित तरुणाचा मृतदेह रस्त्यावरच टाकून पळ काढला. याप्रकरणी कुटुबीयांच्या तक्रारीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, १ जानेवारी रोजी रात्री १ वाजता नोएडातील ‘१४ अ’ उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी कारचालकाने डिलिव्हरी बॉयला धडक देऊन त्याला फरफटत नेल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा- कंझावाला प्रकरण: “अंजली गेली, आता…” आठवणी सांगताना आईच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात
अलीकडेच घडलेल्या दिल्लीतील कंझावाला दुर्घटनेत एका कारने स्कूटरवरून जाणाऱ्या २० वर्षीय तरुणीला धडक दिली होती. यानंतर आरोपींनी पीडितेला सुमारे १२ किलोमीटर कारसोबत फरफटत नेलं. यावेळी कारमधून पाचजण प्रवास करत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.