UPSC New Exam Portal : पूजा खेडकरने केंद्रीय लोकसेवा आयोगाला चुकीची माहिती देऊन फसवणूक केली होती. अपंगत्वासह स्वतःचे आणि पालकांच्या नावात बदल अशी तफावत विविध अर्जांमध्ये आढळून आली होती. त्यामुळे याप्रकरणातनंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याकरता आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं असणार आहे. त्याकरता युपीएससीने सुधारित परीक्षा पोर्टलही सुरू केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आधार-आधारित प्रमाणीकरणासह (Aadhar Authentication) त्यांचे सुधारित परीक्षा पोर्टल सुरू केले. या वेब पोर्टलच्या आठवड्याभरात जवळपास ९२ टक्के उमेदवारांनी आपली ओळख पडताळणीसाठी आधारचा वापर केला आहे, असं वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

चार टप्प्यात होणार विद्यार्थ्यांची नोंदणी

२८ मे रोजी सुरू झालेले हे नवीन पोर्टल, यूपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. उमेदवारांना आता upsconline.nic.in या पोर्टलवर खाते तयार करणे, सार्वत्रिक नोंदणी, अर्ज भरणे आणि परीक्षा अर्ज या चार प्रक्रियेद्वारे नोंदणी करावी लागणार आहे.

यूपीएससीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन प्लॅटफॉर्मवर २.६५ लाख खाती तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी १.१३ लाख वापरकर्त्यांनी सार्वत्रिक नोंदणी पूर्ण केली आणि त्यापैकी १.०५ लाख वापरकर्त्यांनी आधार प्रमाणीकरण (Aadhar Authentication) निवडले. सुमारे ६० हजार वापरकर्त्यांनी सामान्य अर्ज फॉर्म भरले, तर ५५ हजार फॉर्म अद्याप प्रक्रियाधीन आहेत.

एकदा भरलेली माहिती पुन्हा उपयोगात येणार

“आम्ही पोर्टलची वैशिष्ट्ये सतत सुधारत आहोत. डुप्लिकेशन दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे – उमेदवारांना त्यांची माहिती अनेक वेळा प्रविष्ट करावी लागणार नाही. एकदा सबमिट केल्यानंतर, ती विविध परीक्षांसाठी पुन्हा वापरली जाऊ शकते”, असं यूपीएससीचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

यूपीएससी पहिल्यांदाच त्यांच्या परीक्षांसाठी बायोमेट्रिक-आधारित प्रमाणीकरण लागू करत आहे. जरी आधार हे यापूर्वी अनेक ओळखपत्रांपैकी एक म्हणून स्वीकारले गेले असले तरी, आयोगाने पूर्वी बायोमेट्रिक प्रमाणीकरण केले नव्हते. २८ ऑगस्ट २०२४ रोजी जारी केलेल्या DoPT अधिसूचनेने UPSC ला नोंदणी टप्प्यावर व परीक्षा आणि भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये, होय/नाही किंवा ई-केवायसी प्रमाणीकरण वापरून आधार पडताळणी वापरण्याची परवानगी दिली.

पूजा खेडकर या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी यांच्या हाय-प्रोफाइल प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला. पूजा खेडकरने जास्तीत जास्त प्रयत्न करूनही २०२२ च्या नागरी सेवा परीक्षेला बसल्याचा आरोप आहे. नंतर यूपीएससीने तिच्या अर्जात तफावत असल्याचे कारण देत तिची उमेदवारी रद्द केली, ज्यामध्ये तिच्या नावात आणि तिच्या पालकांच्या नावात बदल आढळून आले. त्यानंतर डीओपीटीने तिला सेवेतून काढून टाकले. खेडेकरने हे आरोप फेटाळले असून या निर्णयांना न्यायालयात आव्हान दिले आहे. नवीन पोर्टलमध्ये नागरी सेवा परीक्षा, संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी परीक्षा यासह १४ प्रमुख यूपीएससी परीक्षांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधार प्रमाणीकरण ऐच्छिक

आधार प्रमाणीकरण ऐच्छिक असले तरी, यूपीएससी उमेदवारांना ते निवडण्यास प्रोत्साहित करत आहे, कारण यामुळे पडताळणीला गती मिळते. इतर प्रकारचे ओळखपत्र निवडणाऱ्यांना प्रमाणीकरण प्रक्रियेत विलंब होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २८ मे रोजी एका निवेदनात, यूपीएससीने म्हटले होते, “अर्जदारांना आयडी आणि इतर तपशीलांची सोपी, सहज आणि अखंड पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी युनिव्हर्सल अॅप्लिकेशनमध्ये त्यांचे आधार कार्ड ओळखपत्र दस्तऐवज म्हणून वापरण्याचा सल्ला दिला जातो, त्यानंतर ते सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी आणि सामान्य रेकॉर्ड म्हणून काम करते.”