लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच दिल्लीत काँग्रेसला धक्का बसला आहे. पक्षाचे दिल्ली अध्यक्ष अरविंदरसिंग लवली यांनी काही दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. आम आदमी पक्षाशी आघाडीला विरोध करत त्यांनी हे पाऊल उचलले होते. आता त्यांनी यावरून प्रतिक्रिया दिली आहे.

“काँग्रेस पक्षावर कोणतीही नाराजी नाही. परंतु, पदाला १०० टक्के देण्यात मी असमर्थ आहे असं मला वाटत होतं. पक्षातील काही समस्या मी लक्षात आणून दिल्या असून त्यावर लक्ष दिलं पाहिजे असं पक्षाला सांगितलं आहे”, असं अरविंदरसिंग लवली म्हणाले.

लवली यांनी राजीनामा का दिला?

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतून दिल्लीतील सातपैकी तीन जागा काँग्रेस लढवत असून, चार जागा आम आदमी पक्ष लढवत आहे. काँग्रेसने दोन ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप लवली यांनी पत्रकार परिषदेत केला. ईशान्य दिल्लीतून कन्हैय्याकुमार तर वायव्य दिल्लीतून उदित राज हे दोघेही बाहेरून आले असताना त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाचा टोला

देश तोडण्याची भाषा बोलणाऱ्यांबरोबर कोणीही राहू शकत नाही हेच लवली यांच्या राजीनाम्याने सिद्ध झाल्याचा टोला भाजपचे दिल्ली अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी लगावला आहे. तर हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने दिली आहे.