कुणी पाच जोडे मारतो म्हटलं ना तर आम्ही त्याला १० जोडे मारु हे वक्तव्य आहे भाजपाच्या आमदाराचं. भाजपाच्या रायबरेली भागात पक्षांतर्गत कुरबुरी समोर येत आहेत. तेथील आमदार आदिती सिंह यांनी आता पाच जोडे मारतो म्हटलं तर दहा मारु असं वक्तव्य केलं आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

२० सप्टेंबरला नेमकं काय घडलं?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की २० सप्टेंबर रोजी अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने एक मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला गाडी, स्टॉल लावून व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून लाच घेतली जाते असा आरोप इथल्या व्यापाऱ्यांनी केला. गाडी, स्टॉल लावणाऱ्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी आमदार आदिती सिंह येथे पोहचल्या होत्या. त्यांनी लाचखोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर करावाई करा अशी मागणी केली. तसंच त्या म्हणाल्या, “मला सहसा राग येत नाही. पण आज मी या रस्त्यावर व्यवासया करणाऱ्या लोकांची बाजू मांडण्यासाठीच मी इथे आले आहेत. रोज हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांसाठीच मी इथे आले आहे. हे माझं शहर आहे. कुणी पाच जोडे मारले तर मी दहा जोडे मारेन.” असं आदिती सिंह यांनी म्हटलं आहे.

आदिती सिंह यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

आदिती सिंह म्हणाल्या, मला समजलं आहे की काही लोक खास करुन माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक लोक आणि पत्रकार यांना धमकावलं जातं आहे. ही बाबही मी खपवून घेणार नाही. ज्यांना जशी कळते त्या भाषेत मी उत्तर देईन. आदिती सिंह यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्या राकेश सिंह यांच्या पोस्टबाबत हे म्हणाल्या आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. राकेश सिंह यांनी एक पोस्ट लिहिली होती. त्यात माझ्या कुटुंबातील लोकांची प्रतिमा मलीन केली जाते आहे असा उल्लेख त्यांनी केला होता.

राकेश सिंह यांची पोस्ट आणि आदिती चिडल्या

राकेश सिंह हे उद्यान मंत्री दिनेश प्रताप सिंह यांचे भाऊ आहेत. आदिती सिंह आणि दिनेश प्रताप सिंह हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे राकेश सिंह यांनी केलेल्या पोस्टवरुन वाद निर्माण झाला होता. त्यामुळे वरवर जरी हे प्रकरण व्यावसिकांच्या कैवार घेण्याचं वाटत असलं तरीही हे भाजपात सुरु असलेल्या अंतर्गत कलहांचं आहे असंच दिसतं आहे.