पाटणा : ‘‘बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्यावर वाढत्या वयाचा परिणाम होऊ लागला आहे. ज्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही अशा लोकांनी त्यांना घेरले आहे. त्यामुळे ‘राजकीयदृष्टय़ा’ एकटे पडल्याची भावना त्यांना भेडसावत आहे,’’ अशी टीका निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी रविवारी केली.

नीतिशकुमार यांनी नुकतेच प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना म्हटले होते, की किशोर यांनी एकदा आपल्याला संयुक्त जनता दल (जदयू) काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला होता. ते भाजपसाठी काम करत आहेत. सध्या बिहारच्या साडेतीन हजार किलोमीटरच्या पदयात्रेत असलेल्या किशोर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, की हळूहळू वाढत्या वयाचा प्रभाव नीतिशकुमारांवर दिसू लागला आहे. तो धास्तावलेले दिसतात. किशोर यांनी नीतिशकुमार यांच्यासह व्यावसायिकरीत्या व त्यांच्या पक्षात सहभागी होऊनही काम केले आहे.