उत्तर प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री डॉ. गिरराज सिंह धर्मेश यांनी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. मायावती या विजेच्या उघड्या तारेसारख्या असून त्यांना शिवणाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, असे वक्तव्य धर्मेश यांनी केले आहे.
धर्मेश हे योगी सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये समाज कल्याण, अनुसूचित जाती जमाती मंत्री आहेत. बुधवारी आग्रा येथील सर्कीट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मायावतींसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. ‘मायावती कोणाच्याच बाजूने नाहीत. त्यांनी समाजवादी पक्षालाही धोका दिला आहे. लोकसभा निवडणुकीआधी त्यांच्या शून्य जागा होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचे उमेदवार १० जागी निवडून आले आणि समाजवादी पक्षाच्या केवळ पाच जागांवर निवडून आली. समाजवादी पक्षाचा फायदा घेतल्यानंतर त्या सपापासून दूर झाल्या. त्या विजेच्या उघड्या तारेप्रमाणे आहेत त्यांना जो शिवेल तो मरेल,’ असे वक्तव्य धर्मेश यांनी केले.
पेशाने डॉक्टर असलेले धर्मेश हे आग्र्यातील कैंट येथील आमदार आहेत. त्यांनी १९९४ साली भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते २०१२ साली त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. २०१७ साली त्यांना भाजपाने पुन्हा तिकीट दिले आणि ते निवडून आले. मागील आठवड्यामध्येच त्यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
धर्मेश यांनी “भाजपाने मायावती यांनी तीन वेळा मुख्यमंत्री बनवले हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे,” असं म्हटलं आहे. ‘कांशीराम यांचा संक्षयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची सीबीआयकडून चौकशी व्हायला हवी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे करणार आहोत,’ असेही धर्मेश यांनी सांगितले.
दरम्यान, कालच मायावती यांची बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.