Ahmedabad Plane Crash : हमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफनंतर अवघ्या पाच मिनिटांत अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान याच विमानातून प्रवास केलेल्या एका प्रवाशाने व्हिडीओ पोस्ट केला आहे. आकाश वत्स या प्रवाशाचं नाव आहे. या प्रवाशाने दुर्घटनेच्या दोन तास आधी दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास याच विमानाने केला होता. त्याने त्याच्या एक्स पेजवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
काय म्हटलं आहे आकाश वत्सने?
“मी याच विमानाने दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला. त्यावेळी विमानातल्या अनेक गोष्टींकडे, त्रुटींकडे मी लक्ष वेधलं. मी त्याचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ मी एअर इंडियाला टॅग केला आहे. मला यासंदर्भातले आणखी तपशीलही द्यायचे आहेत असं म्हणत आकाशने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
व्हिडीओत आकाश काय म्हणताना दिसतो आहे?
या व्हिडीओत आकाश म्हणतो, विमानातला एसी काम करत नाहीये. प्रत्येक प्रवाशाकडे बघा. सीटवरचे टीव्ही स्क्रीन काम करत नाहीत. त्याचप्रमाणे विमानतले लाईट्सही काम करत नाहीत. मी दोन तासांपूर्वी याच विमानाने दिल्लीहून अहमदाबादला आलो आहे. असं म्हणत या प्रवाशाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांना तुम्ही अशा सेवा पुरवत आहात का? असाही सवाल आकाशने या व्हिडीओत केला आहे. दरम्यान या विमानाचाच नंतर दुपारी १.३० ते १.४५ च्या दरम्यान अपघात झाला. या विमानाने लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलं आणि अवघ्या काही मिनिटांतच विमानाचा अपघात झाला. मी याबाबत माहिती देऊ इच्छितो असं आकाशने म्हटलं आहे. एनडीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
विमानात नेमके किती प्रवासी, क्रू मेंबर्स होते?
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, अशी माहिती डीजीसीएच्या निवेदनात देण्यात आली आहे. त्याशिवाय, या विमानात २ वैमानिक व १० केबिन क्रू मेंबर्स होते, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. कॅप्टन सुमीर सभरवाल हे या विमानाचे वैमानिक होते. त्यांना ८ हजार २०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे. त्याशिवाय केबिन क्रूलादेखील ११०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, असं एअर इंडियाने निवेदनात म्हटलं आहे.