हुकूमशाही वृत्ती असलेल्या व्यक्तीकडून लोकशाहीचे संवर्धन होणार नाही, समाजात फूट पाडणाऱ्यांना देश कदापि स्वीकारणार नाही, असे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तांतर होणार नाही, असा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात येथे केला. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये बदल करावेत की नाहीत, हा मुद्दाच नसून कोणते बदल करावेत, एवढेच ठरवायचे आहे, असे सांगून देशात बदल होणार नसला तरी काँग्रेस पक्षात मोठा बदल होणार असल्याचे संकेतही दिले.
हाताच्या बाह्य़ा वर करून जणू काही युद्धभूमीवर असल्याच्या आवेशात राहुल गांधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले. समाजात फूट पाडून माणसांना परस्परांविरोधात लढायला लावणाऱ्यांना देश कधीही स्वीकारणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा नामोल्लेख टाळून केली. आपल्या ४५ मिनिटांच्या घणाघाती भाषणात राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची पाठराखण केली तर भाजप व नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर ते म्हणाले की, हा पक्षाने घेतलेला निर्णय आहे. पक्षाच्या संविधानानूसार काँग्रेस पक्ष आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडेल.
आगामी लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कांग्रेससाठी ही निवडणूक ‘टर्निग पाईंट’ आहे. सामान्य नागरिक व सामान्य कायकर्त्यांंच्या अपेक्षा उंचावल्या असून याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे. उमेदवार निवडताना पंधरा टक्के लोकसभा मतदारसंघात स्थानिक कार्यकर्ते, ग्रामीण भागातील नाग्रिकांचे मत विचारात घेतले जाईल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दाखल होणाऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही, असा सज्जड जम राहुल गांधी यांनी भरला.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली सलग साडेनऊ वर्षे सत्ता हाकणाऱ्या संपुआच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या निर्णयांची जंत्रीच राहुल गांधी यांनी सादर केली. माहिती अधिकार कायद्याचा आवर्जून उल्लेख करीत सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरची संख्या बारापर्यंत वाढविल्याचे त्यांनी सांगितले.
बंद दाराआड निवडणूक जाहिरनामा ठरविणाऱ्या स्वपक्षीयांवर राहुल गांधी यांनी कोरडे ओढले. बंद दाराआड चर्चा होण्याऐवजी दलित, महिला, सामान्य माणूस, युवक, स्वयंसेवी संस्थांना यात सहभागी करून घ्यावे. आगामी अधिवेशनात भ्रष्टाचारविरोधात लढण्यासाठी महत्त्वाची विधेयके मंजूर करवून घ्यावीत, असा सल्ला राहुल यांनी सरकारला दिला.
‘आप’चे दडपण
वर्षभरापूर्वी अस्तित्वात आलेल्या आम आदमी पक्षाची दखल राहुल गांधी यांना घ्यावी लागली. ‘आप’ नेत्यांचा उल्लेख टाळून राहुल म्हणाले की, नवीन माणसे सभोवती दिसत आहेत. ज्यांना टक्कल आहे, अशांना ही माणसे कंगवा विकतात. त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. मात्र ‘आप’च्या उमेदवार निवड प्रकियेची धास्ती घेत राहुल यांनी स्वपक्षीयांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना काळजी घेण्याचा सल्ला दिला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या विचारांना महत्त्व दिलेच गेले पाहिजे. आचारा-विचाराने काँग्रेसी असलेल्यांनाच उमेदवारी देण्यात यावी. याचा अर्थ इतरांना पक्षाची दारे बंद झाली असा होत नाही. सकारात्मक विचार करणाऱ्यांची देशाला गरज आहे.