अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील रामभक्त आतुर आहेत. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली आहे. तर महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवसाची सुट्टी लागू केली आहे. तर, विविध राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवसाची सुट्टी आहे. परिणामी अनेक सरकारी आस्थापने, सेवा केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे मिळाल्याने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा ( एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) विभागही २२ जानेवारी रोजी २.३० वाजेपर्यंत बंद राहणार होता. परंतु, यामुळे देशभरात गदारोळ झाल्याने रुग्णालय आस्थापनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे.

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा ( एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सोमवारीही खुला राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर करून माहिती दिली. AIIMS प्रशासनाने रविवारी जारी केलेल्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की, “रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आणि रूग्ण सेवा सुविधा सुलभ करण्यासाठी बाह्यरुग्ण सेवांसह सर्व क्लिनिकल सेवा खुल्या राहतील. सर्व केंद्रप्रमुख, विभागप्रमुख, युनिट्स आणि शाखा अधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी हे त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

हेही वाचा >> Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १५ जोडप्यांना मिळाला बहुमान, महाराष्ट्रातील दोन जोडप्यांचाही समावेश; मुख्य यजमानपद कोणाला?

शनिवारी, रुग्णालय आस्थापनाने जाहीर केले होते की २२ जानेवारी रोजी दुपारी २.२३० वाजेपर्यंत ओपीडी बंद ठेवली जाईल. फक्त आपत्कालीन आणि गंभीर सेवा सामान्यपणे कार्यरत राहतील. एम्सच्या ओपीडीमध्ये दररोज सरासरी १५,००० रुग्ण उपचारार्थ येतात.

लेफ्टनंट-गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी शनिवारी अयोध्येतील राम लल्ला ‘प्राणप्रतिष्ठा’ निमित्त २२ जानेवारी रोजी दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालये, ULB, स्वायत्त संस्था, उपक्रम, मंडळे इत्यादी अर्ध्या दिवसासाठी बंद ठेवण्यास मंजुरी दिली.