AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यांचा विरोध करत पलटवार केला आहे. ‘द ऑर्गनायझर’ आणि ‘पाञ्चजन्य’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या नियतकालिकांना भागवत यांनी मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, मुसलमानांना घाबरण्याची गरज नाही. या विधानावर आक्षेप व्यक्त करत ओवैसींनी विचारले आहे की, आम्हाला भारतात राहण्यासाठी आणि आमच्या धर्माचे आचरण कसे करावे? याची परवानगी मोहन भागवत यांच्याकडून घेण्याची गरज नाही. तसेच अल्लाहची मर्जी असल्यामुळेच आम्ही भारतीय आहोत, असेही ते म्हणाले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या मुलाखतीमध्ये देशातील विविध प्रश्नांवर सविस्तर भूमिका विशद केली आहे. मुस्लिम समाजाच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना कोणताही धोका नाही. त्यांना त्यांच्या रुढी पाळायच्या असतील तर ते पाळू शकतात. त्यांना आपल्या पूर्वजांच्या रुढी पुन्हा स्वीकारायच्या असतील, तर ते स्वीकारू शकतात. हा पूर्णत: त्यांचा निर्णय आहे. हिंदू समाज एवढा ताठर नाही. मात्र, त्याच वेळी मुस्लिमांनी आपणच सर्वोत्तम असल्याची हेकेखोर धारणा सोडली पाहिजे.

हे ही वाचा >> जागृत हिंदू युद्धात आक्रमक होणे नैसर्गिक! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत

तुम्हाला खूश ठेवण्यासाठी आम्ही नाहीत

डॉ. मोहन भागवत यांच्या मुलाखतीनंतर असुदद्दीन ओवैसी यांनी ट्विटरवर ट्विटची एक मालिकाच पोस्ट केली आहे. यात त्यांनी या मुलाखतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, “मोहन भागवत कोण आहेत? जे मुसलमानांना भारतात राहण्याची आणि धर्माचे आचरण करण्याची परवानगी देतायत. अल्लाहची मर्जी आहे म्हणूनच आम्ही भारतीय आहोत. आमच्या नागरिकतेवर अटी-शर्ती लावण्याची त्यांची हिंमत कशी झाली? आम्ही नागपूरच्या कथित ब्रह्मचाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी नाही आहोत.”

चीनशी चोरी आणि आमच्यावर शिरजोरी

ओवैसी पुढे म्हणाले की, “चीन समोर तुम्ही दबकून राहतात आणि आमच्यावर शिरजोरी कसे करता. जर आपण युद्धजन्य परिस्थितीत आहोत, तर मग केंद्र सरकार मागच्या आठ वर्षांपासून झोपली आहे का? तसेच हिंदूचे प्रतिनिधी म्हणून मोहन भागवत यांची निवड कुणी केली. ते २०२४ ची निवडणूक लढविणार आहेत का? तर मग त्यांचे स्वागतच करु. त्यांनी हे देखील सांगितले की बहुसंख्य हिंदू संघाच्या वक्तव्यांना चिथावणीखोर समजतात. मग अल्पसंख्यांक समाजाचे लोक काय विचार करतात, ही तर दूरची गोष्ट आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. मोहन भागवत काय म्हणाले होते?

“भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना कोणताही धोका नाही. त्यांना त्यांच्या रुढी पाळायच्या असतील तर ते पाळू शकतात. पण आपण उच्च कुळातील आहोत, आपण पूर्वी या देशावर राज्य केले आहे आणि पुन्हा करू शकतो, केवळ आपला मार्ग योग्य आहे, इतर चुकीचे आहेत, आपण वेगळे आहोत आणि त्यामुळे आपण इतरांबरोबर राहू शकत नाही’ हे ग्रह त्यांनी (मुस्लिमांनी) बाजूला ठेवले पाहिजेत, असे भागवत म्हणाले.”, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडली होती.