एअर इंडिया एक्सप्रेसच्या तब्बल ३०० क्रू सदस्यांनी आजारपणाचे कारण पुढे करत सामूहिक सुट्टी घेतल्यामुळे एअर इंडियाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रू सदस्यांनी एकाचवेळी सुट्टी घेतल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली होती. तसेच काही विमानांचे उड्डाणे पुढे ढकलण्यात आले होते. या गोंधळामुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. यानंतर आता एअर इंडिया एक्सप्रेसनं मोठं पाऊल उचललं असून ३० कर्मचाऱ्यांना थेट कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सामूहिक सुट्टी घेतलेल्या या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे काही मागण्या मांडल्या होत्या. त्यामध्ये वेतनवाढीसह आदी महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. मात्र, यानंतर अचनाक ३०० कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण सांगत सुट्टी घेतली होती. त्यामुळे विमानतळांवर प्रवाशांना तिष्ठत बसण्याची वेळ आली होती. दरम्यान, सामूहिक सुट्टी घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर कंपनीच्या दैनंदिन कारभारामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. याबरोबरच कंपनीने काही कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटमही दिला आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

हेही वाचा : एअर इंडिया एक्सप्रेसच्या २०० कर्मचाऱ्यांनी मारली सामूहिक दांडी; ८० उड्डाणे रद्द

कंपनीने काय म्हटले?

“आजारी असल्याचे कारण सांगून सर्वांनी सामूहिक सुट्टी घेणं हे असं सूचित करतं की, क्रू सदस्य जाणूनबुजून कामात व्यत्यय आणू इच्छित होते. मात्र, हे कायद्याच्या विरोधात आहे. व्यवस्थापनाकडून हेही सांगण्यात आले होते की, सामूहिक सुट्टी घेतल्यामुळे परिणामी मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द करावी लागली. आता संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. एवढेच नाही तर प्रवाशांची गैरसोय झाली.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक सिंह यांनी सांगगितले की, येत्या काही दिवसांत विमान कंपनी आपली विमान संख्या कमी करेल. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आमच्या नेटवर्कवर परिणाम झाला आहे. पुढील काही दिवस आधीच नियोजित उड्डाणे कमी करावी लागतील. तसेच क्रूच्या कमतरतेमुळे ही पावले उचलावी लागतील, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम

एअर इंडियाने आजारी असल्याचे कारण सांगून सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर काही कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटमही दिला आहे. याबरोबरच कर्मचाऱ्यांना दिलेल्या निवेदनात एकत्रितपणे गैरहजर राहिल्याच्या मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विस्तारा एअरलाईन्सच्या नाराज वैमानिकांनी सामूहिक दांडी मारल्यामुळे विस्तारा एअरलाईन्सला फटका बसला होता. त्यानंतर आता एअर इंडिया एक्सप्रेसलाही असाच फटका बसला आहे.