Air India अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमानाचं उड्डाण रद्द झालं आहे. १२ जून रोजी लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर अवघ्या सहा दिवसांनी एअर इंडियाचं अहमदाबाद लंडन हे विमान रद्द झालं आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान रद्द करण्यात आलं आहे अशी माहिती मिळते आहे. दरम्यान या प्रकरणी प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

लंडनला जाणारे प्रवासी संतापले

दरम्यान लंडनला जाणारे प्रवासी चांगलेच संतापले आहेत. एअर इंडियाने विमान प्रवास करुच नका, असं एका प्रवाशाने सांगितलं. तर वसंत बसाणी यांनी सांगितलं मी सकाळीच इथे आलो आहे. मला माझ्या मुलीकडे लंडनला जायचं होतं. आधी मेसेज आला की तुमचं विमान ३ वाजता असेल. चेक इन सुरु केलं आणि त्यानंतर आता सांगण्यात येतं आहे की विमानाचं उड्डाण रद्द झालं आहे. याचं काहीही कारण सांगण्यात आलेलं नाही. बाकीच्या विमानांची उड्डाणं होत आहेत. मात्र एअर इंडियाचं विमानाचं उड्डाण रद्द झालं आहे. कुणी धड काही सांगायलाही तयार नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरवत आहेत. आम्ही ६ ते ७ हजार रुपये खर्चून आलो आहोत. आता आम्ही काय करायचं? असं त्यांनी म्हटलं आहे.

१ वाजून १० मिनिटांनी होणारं उड्डाण अचानक रद्द

IANS या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार Air India चं AI 159 हे विमान दुपारी १ वाजून १० मिनिटांनी लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेणार होतं. मात्र तांत्रिक बिघाडामुळे या विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. हे विमान रद्द झाल्याने त्याचा फटका २०० प्रवाशांना बसला आहे. चेक इन सुरु असताना विमानाचं उड्डाण रद्द झाल्याने आणि कुठलीही माहिती नीट दिली जात नसल्याने प्रवासी संतापले आहेत.

दिल्लीहून विमान आलं, मात्र लंडनसाठी उड्डाण केलंच नाही

अहमदाबादहून लंडनला जाणारं हे विमान दिल्लीहून आलं होतं. त्यानंतर दुपारी १ वाजून ८ मिनिटांनी ते लंडनसाठी उड्डाण करणार होतं. मात्र तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण देत या विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. पीटीआयनेही याबाबतचं वृत्त दिलं आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर श्रेणीतील प्रवासी विमानाला १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून फक्त एका प्रवाशाचा जीव वाचला. या घटनेला काही दिवसही होत नाहीत तोच पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअर इंडियाचं दुसरं विमान उड्डाणही रद्द

लंडन अमृतसर हे विमानही रद्द कऱण्यात आलं आहे. एअर इंडियाच्या दुर्घटनेनंतर अहमदाबाद लंडन विमान आज पहिल्यांदाच अहमदाबादहून उड्डाण करणार होतं ते चेक इन सुरु असताना रद्द करण्यात आलं. त्या पाठोपाठ लंडन अमृतसर विमानाचं उड्डाणही रद्द करण्यात आलं. एअर इंडियचं दिवसभरातलं हे दुसरं उड्डाण आहे जे रद्द करण्यात आलं आहे.