Air India Hong Kong-Delhi flight catches fire : १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेपासून एअर इंडिया ही विमान कंपनी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. आता पु्न्हा एकदा एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या विमानाला लँडिंगनंतर काही वेळातच आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना घडली तेव्हा प्रवासी विमानातून खाली उतरत होते, असे विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत आणि हे विमान सध्या ग्राउंडेड करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट एआय ३१५ हे विमान उतरून ते गेटवर पार्क करण्यात आल्यानंतर काही वेळातच त्याच्या ऑक्झिलरी पॉवर युनिट (APU) ला आग लागली. पण सिस्टम डिझाइननुसार आग लागल्याबरोबर एपीयू आपोआप बंद झाले.
“विमानाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, प्रवासी आणि क्रू सदस्य हे सामान्यपणे खाली उतरले आणि ते सुरक्षित आहेत. पुढील तपासासाठी विमान ग्राउंडेड करण्यात आले आहे आणि रेग्युलेटरला याबद्दल अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे,” असेही प्रवक्त्याने सांगितले.
सोमवारी देखील १६० प्रवासी प्रवासी घेऊन जाणाऱ्या दिल्ली- कोलकाता एअर इंडिया विमानात तांत्रिक बिघाड आढळून आल्याने दिल्ली विमानताळावर या विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले होते, विमान कंपनीच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली आहे. फ्लाइट एआय २४०३ हे विमान अनिवार्य असलेल्या सुरक्षा तपासण्यांसाठी रोखून ठेवण्यात आले. त्यानंतर कॉकपिट क्रूने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे पालन करत उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर सर्व प्रवासी सुरक्षितपणे खाली उतरले. त्यानंतर या विमानाने संध्याकाळी कोलकात्याकडे उड्डाण केले.
यापूर्वी सोमवारी मुंबई विमानतळावर उतरताना कोचीहून येणारे एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली होती. शहरात रात्रभर मुसळधार पाऊस पडला होता, त्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.