‘मॉं ब्लां’ पर्वत दुर्घटना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आल्प्स पर्वतराजीतील ‘मॉं ब्लां’ (मॉंट ब्लॅंक) शिखरावर पाच दशकांपूर्वी झालेल्या एअर इंडियाच्या दुर्घटनेतील मानवी अवषेश सापडले आहेत. हवाई दुर्घटनांतील मृतांच्या अवशेषांचा बॉसन्स हिमनदी परिसरात अनेक वर्षांपासून शोध घेणाऱ्या डॅनियल रोचे यांनी नुकतीच ही माहिती जाहीर केली. भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचा या दुर्घटनेतील मृतांमध्ये समावेश होता.

‘मॉं ब्लां’ पर्वत शिखरावर हात आणि पायाच्या वरच्या भागाचे अवशेष सापडले आहेत. ”मला याआधी कधीच असे अवशेष सापडले नव्हते”, असे डॅनियल यांनी ‘एएफपी’ला सांगितले. १९६६ मध्ये जानेवारीत मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७०७ हे विमान ‘मॉं ब्लां’ शिखराजवळ कोसळले होते. त्यात विमानातील ११७ जणांचा मृत्यू झाला. त्यात डॉ. होमी भाभा यांचाही समावेश होता. या दुर्घटनेआधी १९५० मध्ये एअर इंडियाचे आणखी एक विमान या शिखरावर कोसळले होते. त्यात ४८ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आता सापडलेले मानवी अवशेष हे १९६६ च्या विमान दुर्घटनेतील महिलेचे असावेत, असा अंदाज डॅनियल यांनी व्यक्त केला आहे. या विमानाचे चारपैकी एक इंजिनही सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डॅनियल यांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्यानंतर मानवी अवशेष हेलिकॉप्टरने प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. हे अवशेष तज्ज्ञांकडून तपासण्यात येत आहेत. हे अवशेष एकाच व्यक्तीचे असण्याची शक्यता नाही, असे स्थानिक पोलिस स्टीफन बोझॉन यांनी सांगितले. मात्र, हे अवशेष कोणत्या विमान दुर्घटनेतील आहेत, हे सांगणे अवघड असल्याचे बोझॉन यांनी म्हटले आहे. दहा दिवसांपूर्वी स्विस आल्प्स पर्वतात दोन मृतदेह आढळले होते. ते मार्सेलिन डुमोलिन (४०) आणि त्यांची पत्नी फ्रान्सिन (७५) यांचे असल्याचे ‘डीएनए’ चाचणीतून स्पष्ट झाले. सुमारे ७५ वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india plane accident mount black mountain accident
First published on: 30-07-2017 at 02:57 IST