Air India Plane Crashed in Ahmedabad News : अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात आज (१२ जून) दुपारी पावणे दोनच्या सुमारास एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे. अहमदाबादवरून १२ क्रू सदस्य व २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान लंडनला जात होतं. मात्र उड्डाण केल्यानंतर दोन मिनिटांनी हे विमान विमानतळाच्या सीमेजवळ असलेल्या रहिवासी भागात कोसळलं. या दुर्घटनेत मोठी जीवित व वित्तहानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेनंतर मोठ्या वेगाने बचावकार्य चालू आहे. मात्र, या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या दुर्घटनेचे काळजाचा थरकाप उडवणारे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

हे विमान मेघानी नगरमधील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या इमारतीवर कोसळलं असल्याची माहिती अहमदाबादमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. विमानाने उड्डाण केल्यानंतर तीन ते चार मिनिटांनी ते वसतीगृहाच्या इमारतीवर कोसळलं. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर कॅन्टीन असून विद्यार्थी दुपारी येथे जेवण करण्यासाठी येतात. या दुर्घटनेत वसतीगृहातील २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने त्याची पुष्टी केलेली नाही.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलीस अधिकारी म्हणाले, “विमानाने उड्डाण केल्यानंतर चार-पाच मिनिटांनी ते या भागात (मेघानी नगर) कोसळलं अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे. हे विमान डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या इमारतीवर कोसळलं आहे. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर दोन-तीन मिनिटात पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. पाठोपाठ अग्निशमन दल व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी येथे दाखल झाले. आता बचावकार्य चालू करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बचावकार्य वेगाने करता यावं यासाठी आम्ही घटनास्थळ ७० टक्के मोकळं केलं आहे. अजूनही जागा मोकळी करण्याचं काम चालू असून आम्ही स्थानिकांकडून व प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा करत आहोत. बचावपथकं, एनडीआरएफ, बीएसएफची पथकं बचावकार्य करत आहेत. अग्निमशन दल आग विझवण्याचं काम करत आहे. वैद्यकीय मदत पथकं घटनास्थळी दाखल झाली असून आम्ही जखमींना रुग्णालयात घेऊन जात आहोत. मात्र, रुग्णवाहिकांच्या कामात अडथळा येत असल्याने आम्ही सर्वांना विनंती करत आहोत की रस्ता मोकळा करावा. जेणेकरून बचावकार्य सुरळीत पार पडेल. ग्रीन कॉरीडोर तयार करून आम्हाला जखमींना रुग्णालयात न्यायचं आहे.