Air India Flight Cancel : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या घटनेत तब्बल २७४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर एअर इंडिया सावध पावलं टाकताना दिसत आहे. कारण अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाने १७ जून रोजी काही विमानांची उड्डाणे तांत्रिक कारणास्तव रद्द केले होते. त्यानंतर आता एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे १५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागची कारणे वेगवेगळी असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
एअर इंडियाने याबाबतची घोषणा बुधवारी केली आहे. एअर इंडियाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय वाइड-बॉडी विमानांच्या उड्डाणांमध्ये १५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला असून ही कपात तात्काळ प्रभावाने सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय जुलैच्या मध्यापर्यंत लागू राहणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. यामध्ये उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियाच्या काही मार्गांवरील विमानांची उड्डाणे कमी करण्यात आली आहेत.
दरम्यान, अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर विमानाच्या उड्डाणाआधी सुरक्षा तपासणी अनिवार्य करण्यात आल्यामुळे आणि मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे एअर इंडियाच्या मते वेळापत्रकात स्थिरता आणण्यासाठी आणि प्रवाशांची अचानक होणारी गैरसोय कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
कोणते आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी करण्यात आले?
- दिल्ली-नैरोबी : आठवड्यातून चार वेळा
- अमृतसर-लंडन गॅटविक : आठवड्यातून तीन वेळा
- गोवा (मोपा)-लंडन गॅटविक: आठवड्यातून तीन वेळा
उत्तर अमेरिका :
-दिल्ली-टोरंटो : पूर्वी – आठवड्यातून १३ वेळा – आता आठवड्यातून सात वेळा
-दिल्ली-व्हॅन्कुवर : पूर्वी – आठवड्यातून सात वेळा – आता आठवड्यातून पाच वेळा
-दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को : पूर्वी – आठवड्यातून १० वेळा – आता आठवड्यातून सात वेळा
-दिल्ली-शिकागो : पूर्वी – आठवड्यातून सात वेळा- आता आठवड्यातून तीन वेळा
-दिल्ली-वॉशिंग्टन डलेस : पूर्वी – आठवड्यातून पाच वेळा-आता आठवड्यातून तीन वेळा
युरोप :
-दिल्ली-लंडन हीथ्रो : पूर्वी आठवड्यातून २४ वेळा-आता आठवड्यातून २२ वेळा
-बेंगळुरू-लंडन हीथ्रो : पूर्वी आठवड्यातून सात वेळा – आता आठवड्यातून सहा वेळा
-अमृतसर/दिल्ली-बर्मिंगहॅम : पूर्वी आठवड्यातून तीन वेळा- आता आठवड्यातून दोन वेळा
-दिल्ली-पॅरिस : पूर्वी आठवड्यातून १४ वेळा – आता आठवड्यातून १२ वेळा
-दिल्ली-मिलान : पूर्वी आठवड्यातून सात वेळा – आता आठवड्यातून चार वेळा
-दिल्ली-कोपनहेगन : पूर्वी आठवड्यातून पाच वेळा – आता आठवड्यातून तीन वेळा
-दिल्ली-व्हिएन्ना : पूर्वी आठवड्यातून चार वेळा – आता आठवड्यातून तीन वेळा
-दिल्ली-अॅमस्टरडॅम : पूर्वी आठवड्यातून सात वेळा- आता आठवड्यातून पाच वेळा
ऑस्ट्रेलिया :
-दिल्ली-मेलबर्न आणि दिल्ली-सिडनी पूर्वी आठवड्यातून सात वेळा-आता आठवड्यातून पाच वेळा
एअर इंडियाने मागितली प्रवाशांची माफी
दरम्यान, एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा प्रवाशांना फटका बसणार आहे. त्यामुळे एअर इंडियाने प्रवाशांची माफी मागितली आहे. एअर इंडियाने म्हटलं की, “या कपातींमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांची एअर इंडिया माफी मागत आहे. पर्यायी विमानांची सोय, मोफत वेळापत्रक बदलणे किंवा त्यांच्या पसंतीनुसार पूर्ण रक्कम परतावा करण्यासाठी प्रभावित प्रवाशांशी संपर्क साधत आहोत, अशं एअरलाइनने म्हटलं आहे.