हवाई दल मुख्यालयात निरीक्षण तसेच सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी एअर मार्शल मकरंद रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एअर मार्शल संजीव कपूर हे हवाई दलात ३८ वर्षांचा प्रतिष्ठित सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून ३० नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे एअर मार्शल मकरंद रानडे यांनी आजपासून हा पदभार स्वीकारला.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय तसेच फ्रान्सचे कॉलेज इंटरआर्मी द डिफेन्स या शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या एअर मार्शल मकरंद रानडे यांनी ६ डिसेंबर १९८६ पासून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विभागातून सेवेला सुरुवात केली. एकूण ३६ वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत एअर मार्शल मकरंद रानडे यांनी अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये तसेच पदांवर काम केले. लढाऊ विमानांच्या तुकडीचे तसेच दोन हवाई स्थानकांचे कमांड म्हणून केलेल्या कार्याचा समावेश आहे.
रणनीती तसेच हवाई लढा प्रशिक्षण विकास संस्था आणि संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. काबुल तसेच अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासांमध्ये त्यांनी एअर अट्टॅचे म्हणून कर्तव्य निभावले आहे. हवाई दलाच्या मुख्यालयात नेमणूक झालेली असताना त्यांनी संचालक, कार्मिक अधिकारी, हवाई दल कर्मचारी निरीक्षण संचालनालयाचे मुख्य संचालक आणि हवाई दल कार्यकारी (अवकाश) विभागाचे सहाय्यक प्रमुख या पदांवर काम केले आहे. आत्ताच्या नियुक्तीपूर्वी ते नवी दिल्ली येथील पश्चिम एअर कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ कर्मचारी अधिकारीपदावर कार्यरत होते.
एअर मार्शल मकरंद रानडे यांना वर्ष २००६ मध्ये वायू सेना (शौर्य) पदक तसेच वर्ष २०२० मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते.