Dr Randeep Guleria on Air Pollution: दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरवर पुन्हा एकदा दाट धुक्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. राजधानीत प्रदूषण वाढल्यामुळे पुन्हा एकदा आरोग्याचे गंभीर प्रश्न उद्भवले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वाढत्या प्रदूषणावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. वायू प्रदूषण हे एक मूक मारेकरी असून तो देशातील लोकांचा हळूहळू जीव घेत आहे, असा इशारा गुलेरिया यांनी दिला आहे.
प्रदूषित हवेच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, वायू प्रदूषणाचे संकट आता केवळ श्वसनाच्या आजारांपुरते मर्यादित राहिलेले नाही. तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होत आहे.
डॉ. गुलेरिया यांनी वायू प्रदूषणाचे शरीरावर होणारे परिणाम सांगताना म्हटले, पीएम २.५ सारखे सुक्ष्म कण आणि ०.१ मायक्रॉनपेक्षा लहान असलेले अतिसुक्ष्म कण हे फक्त फुफ्फुसांपर्यंत जात नाहीत तर ते रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात. शरीरारच्या सर्व भागांमध्ये ते जाऊ शकतात. हे कण रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ आणि अरुंदीकरण निर्माण करू शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि अगदी डिमेंशियाचा धोका उद्भवू शकतो.
डॉ. गुलेरिया यांच्या मते, प्रदूषणाच्या दीर्घकालीन संपर्कात राहिल्यास खोकला आणि श्वास घेण्याच्या त्रासापलीकडे जाऊन आणखी अपाय होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय संस्थांनीही आता वायू प्रदूषणाला घातक असल्याचे सांगितले आहे. यामुळे हृदयविकाराचा धक्का, हृदय बंद पडणे, स्ट्रोक आणि कर्करोगासारखे आजार होऊ शकतात.
पार्किसन्स आणि डिमेंशिया सारख्या न्यूरोलॉजिकल आजारात तसेच विशिष्ट कर्करोग यांचा प्रदूषित हवेशी संबंध असल्याचे काही संशोधनातून समोर आल्याचेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
करोनापेक्षाही वायू प्रदूषणामुळे मृत्यू
जागतिक पातळीवरील आकडेवारी पाहिली तर वायू प्रदूषणामुळे २०२४ या वर्षात जवळपास ८१ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. करोनापेक्षाही वायू प्रदूषणामुळे एका वर्षात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही मृत्यूची मूक महामारीच आहे, असेही डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
भारताची हवा ही एका दिवसाला ८ ते १० सिगारेट ओढण्याऐवढी प्रदूषित झालेली आहे. अशा प्रदूषित हवेशी सतत संपर्कात आल्यास फुफ्फुस आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही डॉ. गुलेरिया यांनी म्हटले.
