मॉस्को : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शुक्रवारी रशियाचे प्रथम उपपंतप्रधान डेनिस मांतुरोव्ह यांची भेट घेतली. मांतुरोव्ह यांच्याकडे रशियाच्या संरक्षण उद्योग आणि व्यापार खात्याचाही कारभार आहे. या दोघांमध्ये द्विपक्षीय लष्करी-तांत्रिक संबंध आणि सामरिक क्षेत्रांमध्ये संयुक्त प्रकल्पांची अंमलबजावणी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन या वर्षाच्या अखेरीस भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्याची तयारी करणे आणि द्विपक्षीय ऊर्जा व संरक्षण क्षेत्रातील संबंधांवर महत्त्वाची चर्चा करणे, ही डोभाल यांच्या रशिया दौऱ्याची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. त्यांनी गुरुवारी अध्यक्ष पुतिन यांची क्रेमलिन येथे भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्याविषयी चर्चा केली. तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता रशियाबरोबर सर्व आघाड्यांवर सहकार्य करण्यासाठी भारत कटिबद्धता असल्याचा पुनरुच्चार केला.

डेनिस मांतुरोव्ह हे ‘व्यापार, आर्थिक व सांस्कृतिक संबंधांसंबंधी भारत-रशिया संयुक्त आंतरशासकीय आयोगा’चे सह-अध्यक्ष आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे या आयोगाचे दुसरे सह-अध्यक्ष आहेत. डोभाल आणि मांतुरोव्ह यांच्यादरम्यान नागरी वाहतूक विमाने, मेटालर्जी आणि रासायनिक उद्योग या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे रशियाच्या सरकारने प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले.