जातीय सलोख्यासाठी सरकारने गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीवर बंदी घालावी असे मत मांडणाऱ्या अजमेर दर्ग्याच्या प्रमुखांना पदावरुन हटवण्यात आले आहे. दिवाण झैनुल अबेदिन अली खान यांच्या जागी आता त्यांचे बंधू अलाउद्दीन आलिमी हे दर्ग्याचे दिवाण असतील.
गोवंश हत्येपासून दूर राहण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा आणि गोमांस सेवन करु नये असे केल्यास देशात एक सकारात्मक संदेश जाईल असे मत अजमेर दर्ग्याचे प्रमुख दिवाण झैनुल अबेदिन अली खान यांनी मांडले होते. मात्र गोमांस बंदीचे समर्थन करणे झैनुल खान यांना महागात पडले आहे. झैनुल यांचे बंधू अलाउद्दीन आलिमी यांनी मंगळवारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. झैनुल यांना पदावरुन हटवत अलाउद्दीन आलिमी यांनी स्वतःची दर्ग्याच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. आता अलाउद्दीन आलिमी हे दर्ग्याचे प्रमुख असतील.
मंगळवारी सूफी मौलवींनी संयुक्त निवेदन काढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोट्यवधी मुस्लिमांना दिलासा देण्यासाठी या मुद्द्यावर तोडगा काढायला हवा असे या निवेदनात म्हटले आहे. दिल्लीतील हजरत निझामुद्दीन दर्गा, कर्नाटकमधील गुलबर्गा शरीफ, आंध्र प्रदेशमधील हलकट्टा शरीफ तसेच बरेली, जयपूर या भागांमधील मौलवींनीदेखील या निवेदनाचे समर्थन केले आहे.
दरम्यान, मंगळवारी अजमेर दर्ग्यातील प्रमुख दिवाण झैनुल अबेदिन अली खान यांनी गोमांस बंदीचे समर्थन केले होते. यापुढे मी आणि माझे कुटुंबीय गोमांस सेवन करणार नाही असेही त्यांनी जाहीर केले होते. सरकारने गाय हा राष्ट्रीय प्राणी असल्याचे घोषित करावे अशी मागणीच त्यांनी केली होती. तसेच शरियत कायद्यात तिहेरी तलाख नाही असे सांगत त्यांनी तिहेरी तलाखला विरोध दर्शवला होता. देशभरात गोमांस बंदी आणि तिहेरी तलाकवरुन गदारोळ सुरु असतानाच अजमेर दर्ग्यातील प्रमुखांनी या दोन्ही प्रश्नांवर सरकारच्या बाजूने भूमिका मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. मात्र या विधानांमुळे आता अबेदिन यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे.