अजमेर पोलिसांनी अजमेर दर्गाचा खादिम सलमान चिश्ती याला अटक केली आहे. सलमान चिश्ती याने भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात भडकाऊ वक्तव्य केल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. प्रेषितांविरोधात वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपातून निलंबित झालेल्या नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण आपलं घर देणार असं त्याने जाहीर केलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, खादीम सलमान चिश्ती याला रात्री १२ वाजता ४५ मिनिटांनी अटक करण्यात आली. सलमान चिश्ती याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून मर्यादाभंग! ; नूपुर शर्मा प्रकरणी निवृत्त न्यायाधीश-सनदी अधिकाऱ्यांच्या गटाचे मत

उदपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिक कन्हैयालाल यांच्या हत्येआधी हल्लेखोरांनी व्हिडीओ शूट केला होता. त्या आणि सलमान चिश्तीच्या व्हिडीओमधील भाषेत साम्य आढळत आहे. या व्हिडीओत सलमान चिश्ती धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी जाहीरपणे नुपूर शर्मा यांची हत्या करण्याची धमकी देत आहे.

‘नुपूर शर्मांचे शिरच्छेद करणाऱ्याला माझं घर देणार’; अजमेर दर्गाच्या खादिमांचं खळबळजनक विधान

व्हिडीओत सलमान चिश्ती सांगत आहे की, “माझ्या जन्मदात्या आईची शपथ घेऊन सांगतो की, मी तिला सर्वांसमोर गोळी घातली असती. मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो की, मी तिला गोळी घातली असती आणि आजही सांगतो की, जो कोणी तिचा शिरच्छेद करुन मुंडकं आणेल त्याला मी माझं घर देईन”.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजमेर शहराच्या अलवर गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमान चिश्ती यांनी हे विधान केलं तेव्हा नशेत होते असाही पोलिसांचा दावा आहे.