Expelled SP MLA Pooja Pal: उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे नाराज झालेल्या अखिलेश यादव यांनी स्वतःच्या पक्षातील महिला आमदाराची हकालपट्टी केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारीविरोधात कडक पवित्रा घेतल्यामुळेच माझ्यासारख्या अनेक पीडित महिलांना न्याय मिळाला, असे पूजा पाल विधानसभेत म्हणाल्या होत्या. त्यानंतर पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे पूजा पाल यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

पूजा पाल यांचे पती आमदार राजू पाल यांची काही वर्षांपूर्वी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. हत्या झाली तेव्हा पूजा पाल यांच्या लग्नाला केवळ नऊ दिवस झाले होते. या हत्येतील प्रमुख आरोपी अतिक अहमदचा १६ एप्रिल २०२३ रोजी मृत्यू झाला होता. पोलीस त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी घेऊन जात असताना काही हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

आमदार पूजा पाल यांनी स्वतःचे उदाहरण देत प्रयागराजमधील महिलांना योगी आदित्यनाथ यांनी न्याय दिल्याचे सभागृहात म्हटले. योगींमुळेच महिलांना न्याय मिळत असून अतिक अहमदसारख्या गुंडाना धडा शिकवला जात आहे, असे त्या म्हणाल्या.

सभागृहात मुख्यमंत्र्यांची तोंडभरून स्तुती केल्यानंतर काही तासांतच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र समोर आले आहे. ज्यावर आजची (१४ ऑगस्ट) तारीखही आहे. पूजा पाल यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा आणि शिस्तभंग केल्यामुळे त्यांना पक्षातून हटविण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, पूर्वसूचना देऊनही पूजा पाल यांनी आपले वर्तन सुधारले नाही. ज्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. त्यांना पक्षाच्या सर्व पदावरून मुक्त करण्यात येत आहे. समाजवादी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना किंवा बैठकांना त्यांना निमंत्रित केले जाणार नाही.

पूजा पाल काय म्हणाल्या?

पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर पूजा पाल यांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मी प्रयागराजमधील महिलांसाठी सभागृहात आवाज उचलला होता. गुंड अतिक अहमदमुळे फक्त मीच नाही तर उत्तर प्रदेशमधील अनेक कुटुंब त्रास भोगत होते, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माझ्यासह राज्यातील अनेक महिलांना न्याय दिला. मी सपात आल्यापासून जे सत्य आहे, तेच मांडत आले आहे.”