माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या गाड्यांच्या ताफ्याने एकही रुपया न देता टोलनाका ओलांडल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमधील बाराबांकीमध्ये घडला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अखिलेश यांच्या ताफ्यातील एक दोन नव्हे तर तब्बल १७५ गाड्यांनी टोल न भरता प्रवास केला. सामान्य व्यक्तींना टोल भरण्यासाठीदेखील टोल नाक्यावर बराच वेळ थांबावे लागते. मात्र अखिलेश यादव यांच्या वाहनांचा ताफा टोल न भरता अगदी सुस्साट निघून गेला.

समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते राजबली यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमासाठी अखिलेश यादव फैजाबादला जात होते. यासाठी माजी मुख्यमंत्री अनेक वर्षांनंतर महामार्गावरुन लांब पल्ल्याचा प्रवास करत बारांबाकीला रवाना झाले होते. अखिलेश यांचा ताफा ज्यावेळी अहमदपूर टोलनाक्यावर पोहोचला, त्यावेळी त्यांच्या ताफ्यात १७५ हून अधिक वाहने होती. टोलनाक्यावरील नियमांनुसार एका विशेष श्रेणीच्या लोकांव्यतिरिक्त सर्वच वाहनांना टोल द्यावा लागतो. मात्र अखिलेश यांच्या ताफ्यातील सर्वच गाड्या कोणताही टोल न देता भरधाव वेगात निघून गेल्या.

सत्ता गेलेली असूनही त्यामुळे आलेला माज गेला नसल्याचे चित्र अहमदपूर टोलनाक्यावर पाहायला मिळाले. यावेळी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांना थांबवण्याची हिंमत टोलनाक्यावरील कोणीही दाखवली नाही. समाजवादी पक्षाचे सरकार असताना अहमदपूर टोलनाका अनेकदा चर्चेत राहिला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि विधायक यांच्या गुंडांनी अनेकदा या टोलनाक्यावर धुडगूस घातला आहे. आता माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यामुळे हा टोलनाका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.