थायलंडमध्ये सुरु असलेल्या मिस युनिव्हर्स २०२५ च्या स्पर्धे दरम्यान एक संतापजनक प्रकार घडला. मेक्सिकोची स्पर्धक फातिमा बॉशबाबत एका अधिकाऱ्याने अपमानास्पद विधआन केलं. ज्यामुळे कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. फातिमा बॉशला या अधिकाऱ्याने ‘मूर्ख’ (Dumb) असं संबोधलं त्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना ४ नोव्हेंबरची आहे. बँकॉकमध्ये एका स्पर्धेदरम्यान फातिमा बॉशला नवात इत्सरग्रिसिल यांनी मूर्ख असं संबोधलं. ज्यानंतर फातिमा बॉशने ही स्पर्धा सोडली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार नवात इत्सरग्रिसिल यांनी एका शूटमध्ये तू उपस्थित का नव्हतीस? असा प्रश्न फातिमा बॉशला विचारला. तसंच फातिमा काही उत्तर देणार त्याआधीच हा अधिकारी म्हणाला आमच्या निर्देशांचं पालन करत नसशील तर तू मूर्ख आहेस. नवात इत्सरग्रिसिल यांचं हे वक्तव्य तिथे उपस्थित असलेल्या फातिमाला तर खुपलंच पण इतर स्पर्धकही कमालीच्या नाराज झाल्या. दुसऱ्या स्पर्धकांसह फातिमाने ते ठिकाण सोडलं. एवढंच नाही तर सध्याची मिस युनिव्हर्स व्हिक्टोरिया केजरनेही तो कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. स्पर्धकांच्या या कृतीचं कौतुक सोशल मीडियावर होतं आहे.

कोण आहे फातिमा बॉश?

फातिमा बॉश २६ वर्षीय मॉडेल आहे. तिचा जन्म मेक्सिकोमध्ये झाला आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला मिस युनिव्हर्स मेक्सिको २०२५ च्या सन्मानाने गौरवण्यात आलं. थायलँड या ठिकाणी ७४ वी मिस युनिव्हर्स स्पर्धा रंगते आहे. यामध्ये मेक्सिकोचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी फातिमा बॉश आली आहे. फातिमा ही एक मॉडेल, सामाजिक कार्यकर्ती आणि वक्ता आहे. तिने कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. लैंगिक समानतेला प्रोत्साहन मिळावं म्हणून ती गरीब आणि तरुणांची मदत करत असते.

नवात इस्तरग्रिसिल यांनी अखेर मागितली माफी

मिस युनिव्हर्स ही स्पर्धा २१ नोव्हेंबरला थायलँडमध्ये होणार आहे. त्याआधीच हा वाद झाला आहे. ४ नोव्हेंबरला बँकॉक या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात नवात इस्तरग्रिसिल यांनी फातिमा बॉशला मूर्ख असं संबोधल्याने हा वाद सुरु झाला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर नवात यांनी माफी मागितली आहे. मी स्पर्धेला उपस्थित असलेल्या ७५ स्पर्धकांची माफी मागतो असं ते म्हणाले आहेत. यानंतर मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राऊल रोचा म्हणाले यापुढे असा प्रकार स्पर्धेत घडणार नाही याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊ. महिलांचा सन्मान आणि त्यांची प्रतिष्ठा आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. नवात इत्सराग्रिसिल यांनी अकारण मॉडेलचा अपमान केला आणि तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. ही बाब निषेधार्ह आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.