पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीची पहिली विमावाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात दाखल झाली. कोच्ची इथे हा शानदार सोहळा आज सकाळी पार पडला. स्वबळावर विमानवाहू युद्धनौका बांधणे जगात आत्तापर्यंत फक्त मोजक्या देशांना शक्य झाले आहे. त्यामध्ये आता भारतानेही स्थान मिळवले आहे. नौदलाकडे आता आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेच्या साथीला आता विक्रांतची भक्कम अशी साथ मिळणार आहे. हेही वाचा. Navy Flag : अभिमानास्पद! नौदलाच्या नव्या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण! विक्रांतच्या समावेशामुळे नौदलाच्या ताकदीत मोलाची भर पडली आहे. देशाच्या तिन्ही बाजूला असलेल्या अथांग समुद्रावर वर्चस्व ठेवण्यात भविष्यात आयएनएस विक्रांत मोलाची कामगिरी करेल यात शंका नाही. विशेषतः भारताजवळ समुद्रात चीनच्या नौदलाच्या वाढत्या हालचालींना शह देण्याचे काम हे आता विक्रांतच्या माध्यमातून आणखी आक्रमकपणे करणे नौदलाला शक्य होणार आहे. यानिमित्ताने आयएनएस विक्रांतची माहिती प्रमुख मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात… आयएनएस विक्रांतचा आराखडा भारतीय नौदलाने तयार केला असून कोच्चीन शिपयार्डने युद्धनौकेची बांधणी केली आहे.कोच्चीमध्ये २८ फेब्रुवारीला २००९ ला विक्रांतच्या बांधणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली, १२ ऑगस्ट २०१३ मध्ये विक्रांतचे जलावतरण झाले - युद्धनौकेने पहिल्यांदा पाण्याला स्पर्श केला.त्यानंतर पुढील सहा वर्षे विविध उपकरणे, शस्त्रास्त्रे, आवश्यक सुविधा या विक्रांतमध्ये बसवण्यात आल्या.ऑक्टोबर २०१९ ला विक्रांतच्या प्राथमिक चाचण्यांना सुरुवात झाली. कोच्ची बंदरातील चाचण्या यशस्वी झाल्यावर विक्रांतच्या ४ ऑगस्ट २०२१ ला खोल समुद्रातील चाचण्यांना सुरुवात झाली.ऑक्टोबर २०२१, जानेवारी २०२२ आणि जुलै २०२२ या काळात विक्रांतच्या आणखी तीन चाचण्या पार पडल्यावर २८ जुलै ला विक्रांत नौदलाकडे सुपूर्त करण्यात आली.आयएनएस विक्रांतवर Mig -29 K हे लढाऊ विमान तर सी किंग, Ka-31 , Ka- 28, MH-60 R, ALH ध्रुव, चेतक अशी विविध हेलिकॉप्टर तैनात असतील. यांची संख्या ३० एवढी असणार आहे.अशा लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरमुळे नौदलाला समुद्राच्या विस्तृत भागावर वर्चस्व ठेवणे विक्रांतच्या माध्यमातून शक्य होणार आहे.वेळप्रसंगी हवेतली लक्ष्य भेदण्यासाठी युद्धनौकेवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रेही विक्रांतवर तैनात करण्यात आली आहेत.विक्रांत ही २६२ मीटर लांब, ५९ मीटर रुंद आणि साधारण १४ मजली उंच असून पुर्ण क्षमतेने कार्यरत असतांना विक्रांतचे वजन ४५ हजार टन एवढे आहे.समुद्रात जास्तीत जास्त ५६ किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करण्याची विक्रांतची क्षमात असून इंधन भरल्यावर एका दमात आठ हजार किलोमीटर अंतर पार केले जाऊ शकते.विक्रांतवर लढाऊ विमानांच्या पायलटपासून दैनंदिन साफसफाई करणारा नौसैनिक असे एकुण १७५ पेक्षा जास्त अधिकारी आणि १४०० पेक्षा जास्त विविध पदावरील नौसैनिक कार्यरत असणार आहेत.विक्रांतचा डेक हे एक प्रकारचे विमानतळ असून त्याचा आकार हा दोन फुटबॉल मैदाना एवढा आहे.पाच हजार घरांना वीज पुरेल एवढ्या वीजेचा वापर विक्रांत करते, वीज निर्मिती करण्यासाठी तशी उपकरणे यामध्ये बसवण्यात आली आहेत.विक्रांतमध्ये विविध वायर-संवदेकांचे मोठे जाळे असून त्यांची लांबी ही दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त भरेल.विक्रांतचा आराखडा बनवणे, विक्रांतची बांधणी आणि चाचण्या या सर्वांवर आत्तापर्यंत २० हजार कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च झाले आहेत.स्बबळावर विक्रांतच्या केलेल्या यशस्वी बांधणीमुळे यापुढच्या काळात अशाच मोठ्या विमानवाहू युद्धनौका बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता यापुढे आणखी विमावाहू युद्धनौका बांधण्यााचा निर्णय कधी घेतला जातो याची उत्सुकता असणार आहे.