अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ांमुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडयांमुळे मुलांचा बुद्धय़ांक कमी होतो

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडयांमुळे मुलांचा बुद्धय़ांक कमी होतो असे एका संशोधनात दिसून आले आहे. यापूर्वीही अनेक संशोधनात अ‍ॅल्युमिनियमच्या वापराबाबत अनेकदा साशंकता व्यक्त करण्यात आली होती. मुलांच्या शैक्षणिक कामगिरीवर त्याचा परिणाम होत असल्याने अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ांचा स्वयंपाकात वापर टाळावा असा इशारा देण्यात आला आहे.

व्हिएतनामध्ये अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरण्याचे प्रमाण जास्त असून एका भांडय़ातून २८०० पट जास्त शिसे सोडले जाते. कॅलिफोर्नियातील शिशाचा एका दिवसाची प्रमाणित व धोकादायक नसलेली मात्रा ०.५ मायक्रोग्रॅम आहे. अ‍ॅशलँड युनिव्हर्सिटी व ऑक्युपेशनल नॉलेज इंटरनॅशनल या संस्थांच्या वैज्ञानिकांनी दहा विकसनशील देशातील अ‍ॅल्युमिनियम भांडय़ांचे नमुने तपासले असता त्यातील एक तृतीयांश भांडी जास्त प्रमाणात शिसे सोडतात असे दिसून आले. त्यातून अ‍ॅल्युमिनियम , आर्सेनिक व कॅडमियम यांचीही घातक मात्रा बाहेर पडते.

आफ्रिका, आशियात भंगार धातूपासून भांडी बनवली जातात. संगणकाचे सुटे भाग, कॅन्स, औद्योगिक कचरा, वाहनांचे सुटे भाग यांचा वापर करून भांडी बनवतात. त्याबाबत कुठलेही नियम लागू नाहीत पण जागतिक आरोग्य संघटनेच्या मते शिशाचे अल्प प्रमाणही शरीरास घातक असते. मुलांमध्ये एक डिसीलिटरमागे ३.५ मायक्रोग्रॅम शिसे शरीरात जाणेही धोकादायक असते, असे अमेरिकेच्या ‘सीडीसी’ या संस्थेने म्हटले आहे. अ‍ॅल्युमिनियमची भांडी स्वस्त असतात त्यामुळे गरीब लोक ती वापरतात. मात्र, त्यातून शिसे बाहेर पडते, असे ऑक्युपेशनल नॉलेज इंटरनॅशनलचे पेरी गोटसफेल्ड यांनी सांगितले. जगात  गॅसोलिन मध्ये शिशावर बंदी असतानाही आफ्रिका व आशियात लोकांच्या रक्तात शिशाचे प्रमाण जास्त दिसले आहे.

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ात अन्न शिजवल्याने शिशासह अनेक घातक घटक पोटात जातात व विषबाधा होते. या भांडय़ांच्या वापरातून कॅडमियम शरीरात जाते, त्यामुळे मुलांचा बुद्धयांक कमी होतो, असे अ‍ॅशलँड विद्यापीठाचे जेफ्री वेडेनहॅमर यांनी सांगितले. आता करण्यात आलेल्या प्रयोगात अ‍ॅल्युमिनियम सहा पट, तर कॅडमियम ३१ पट अधिक दिसून आले आहे. कॅडमियममुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो व हृदयविकारही जडतो. मतिमंदत्व येते. जगात ८ लाख ५३ हजार लोक शिशाच्या विषबाधेने दरवर्षी मरतात. ‘जर्नल सायन्स ऑफ द टोटल एनव्हायर्नमेंट’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aluminium utensils not good for health