दिल्लीतील ओखला येथील आम आदमी पार्टीचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांचा व्यावसायिक भागीदार हमीद अली याला अटक करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांनी हमीद अलीला शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक केली आहे. पोलिसांनी हमीद अलीच्या घरातून एक बेरेटा पिस्तूल, काही गोळ्या आणि १२ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (दिल्ली एसीबी) काल अमानतुल्ला खान आणि हमीद अली यांच्या घरावर छापे टाकले होते.

हेही वाचा- ७० खून आणि २५० दरोडे; एकेकाळचे कुख्यात डाकू रमेश सिंग सिकरवार बनले ‘चित्ता मित्र’, आफ्रिकेतून आणलेल्या चित्यांचं करणार रक्षण

तपासादरम्यान हल्ला केल्याच्या एसीबी पथकाचा आरोप

अमानतुल्ला खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. हमीद अली आणि कौशर इमान सिद्दीकी यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कौशर इमाम सिद्दिकीच्या लपून बसलेल्या ठिकाणाहून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अद्याप सिद्दिकीला अटक झालेली नाही. छाप्यात अडथळा आणल्याचा तिसरा गुन्हाही एसीबीने नोंदवला आहे. तपासादरम्यान अमानतुल्लाचे नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप एसीबीच्या पथकाने केला आहे.

हेही वाचा- VIDEO: दोन कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनावरुन काँग्रेसने उडवली मोदींची खिल्ली, तरुणांना बेरोजगारीची भेट दिल्याचा आरोप

काय आहे प्रकरण?

दोन वर्षे जुन्या भ्रष्टाचार प्रकरणाची एसीबीने काल आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक केली होती. २०२० मध्ये अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली वक्फ बोर्डाच्या भरतीमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप झाला होता. अमानतुल्ला खान हे दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत. एसीबीने अमानतुल्ला खान यांच्या घरावर आणि इतर ठिकाणांवर छापे टाकून २४ लाख रुपये रोख आणि एक विना परवाना शस्त्र जप्त केले आहेत.

आप’चा भाजपावर आरोप

यापूर्वी, एसीबीने दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या सचिवालयाला पत्र लिहून वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदावरून अमानतुल्ला खान यांना हटवण्याची विनंती केली होती. अमानतुल्ला खान यांनी साक्षीदारांना धमकावून तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा एसीबीने पत्रात केला होता. अमानतुल्ला खान यांच्यावर एसीबीच्या कारवाईनंतर आम आदमी पार्टीने हे भाजपचे षड्यंत्र आहे आणि आप आमदारांना जबरदस्तीने गोवले जात असल्याचा आरोप केला आहे.