पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतंत्र पक्ष स्थापून भाजपाशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर, प्रदेश काँग्रेस आणि राज्य सरकारने त्यांच्या विरोधातील संघर्ष तीव्र केला आहे. अमरिंदर यांच्या पाकिस्तानी पत्रकार मैत्रिणीचे पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’शी संबंध असल्याचा दावा करत पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी, या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. या आरोपांनंतर अमरिंदर सिंग यांच्याकडूनही ताबोडतोड प्रत्युत्तर आलं होतं. तर,  अरूसा आलम यांनीही याप्रकरणी मौन सोडलं असून त्यांनी त्यांच्या आणि अमरिंदर सिंग यांच्या नात्याविषयी स्पष्टीकरण दिलंय.

“माझे कॅप्टन साहेबांशी अतिशय माणुसकीचे नाते आहे. मी त्यांची खूप चांगली मैत्रीण आहे, याचा मला खूप अभिमान आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. आमच्या नात्यावर टीका करणारे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोक नैतिकतेच्या बाबतीत सिंग यांच्या जवळही जाऊ शकत नाही,” असं म्हणत अरूसा आलम यांनी टीका केली. यावेळी अरूसा यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना “निर्लज्ज” म्हणत सुनावलं. तसेच त्यांनी दावा केला की RAW ने त्यांना आयएसआयशी संबंध असल्याच्या सर्व आरोपातून मुक्त केले आहे. “मी आणि पाकिस्तानमधील माझ्या कामांची RAWने परस्पर गुप्तचर संस्थांमार्फत कसून तपासणी केली आहे. सर्व तपासणीनंतर मला रॉ आणि इतर आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांनी सर्व आरोपातून मुक्त केले आहे,” असा दावा अरूसा आलम यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना केला.

दरम्यान, अमरिंदर यांना त्यांच्याच सहकाऱ्यांनी ज्या प्रकारे त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले. त्यामुळे सिंग दुखावले गेले होते. ज्या लोकांनी त्यांना पदावरून हटवलं, ती लोकं सिंग यांच्यामुळेच राजकारणात मोठी झाली, त्यामुळे काँग्रेसने माकडाच्या हातात वस्तरा दिला आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल न्याय मिळवण्यासाठी त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ शकते, असा इशारा त्यांनी दिलाय. तसेच “ज्यांनी माझे फोटो आणि माहिती प्रसिद्ध केली अशा सर्व राजकारणी आणि मीडिया हाऊसच्या विरोधात मानहानीच्या याचिका दाखल करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि मानवाधिकार आयोगामार्फत मी त्यांच्यावर बंदी घालणार,” असा इशाराही अरूसा आलम यांनी दिला.