‘पांचजन्य’ नियतकालिकातील आरोप; चौकशी करा : रा. स्व. संघ 

नवी दिल्ली : ऑनलाइन व्यापारातील महाकाय कंपनी अमेझॉन ही दुसरी ‘इस्ट इंडिया कंपनी’च आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ या नियतकालिकातील मुख्य लेखात करण्यात आला आहे. ‘इस्ट इंडिया कंपनी २.०’ असे या लेखाचे शीर्षक आहे.

‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी सोमवारी या नियतकालिकाच्या आगामी अंकाचे मुखपृष्ठ ट्वीटरवर प्रसारित केले. मुखपृष्ठावर अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचे छायाचित्रही आहे. ‘पांचजन्य’च्या ३ ऑक्टोबरला बाजारात येणाऱ्या अंकात अ‍ॅमेझॉनवर कडाडून टीका करणारी ‘मुखपृष्ठ कथा’ करण्यात आली आहे. त्यात या कंपनीचे वर्णन ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असे करण्यात आले आहे. ‘भारतावर कब्जा मिळवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने अठराव्या शतकात जे केले, तेच अ‍ॅमेझॉनच्या कृतींमधून दिसून येते,’ असे या लेखात नमूद केले आहे.

‘अ‍ॅमेझॉन’ने सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी फार मोठी रक्कम वापरल्याचे उघड केल्याचे ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी ‘आयएएनस’ या वृत्तसंस्थेला सांगितले. आपल्या कुठल्या चुकीच्या गोष्टीमुळे लाच देण्याची गरज भासते असा प्रश्न अ‍ॅमेझॉनला विचारायला हवा, असे ते म्हणाले.

दरम्यान, ‘पांचजन्य’मध्ये ‘अ‍ॅमेझॉन’ या अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनीवर केलेले आरोप गंभीर असल्याचे सांगून, सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. आपल्याला अनुकूल अशा सरकारी धोरणांसाठी या कंपनीने कोटय़वधी रुपयांची लाच दिल्याचा आरोप या साप्ताहिकाने केला आहे. ‘पांचजन्य’चे वृत्त सूत्रांच्या माहितीवर आधारित असून, त्यामुळे याबाबत योग्य ती चौकशी होणे आवश्यक आहे, असे संघाचे अभ्यासक असलेले राजीव तुली यांनी सांगितले. प्रचंड रकमा केवळ वकिलांवर किंवा सल्ल्याच्या नावावर खर्च करणे हा तपासाचा विषय आहे. अ‍ॅमेझॉनमुळे लहान व्यापाऱ्यांवर होणाऱ्या परिणामांचाही तपास व्हायला हवा आणि अ‍ॅमेझॉननेही या मुद्दय़ावर भूमिका मांडायला हवी, असे तुली म्हणाले.

अ‍ॅमेझॉनला भारतीय बाजारपेठ आणि अर्थव्यवस्था काबीज करायची आहे. या कंपनीमुळे भारतीय संस्कृतीचेही नुकसान होत आहे. ईस्ट इंडिया कंपनीनेही असेच केले होते. ही कंपनी एखाद्या देशाच्या धोरणांवर प्रभाव टाकण्यासाठी काम करते, असे शंकर यांनी सांगितले.

ज्यासाठी लाच देणे भाग पडते, अशी कोणती गैर गोष्ट अमेझॉन करते? देशी उद्योजकता, आर्थिक स्वातंत्र्य आणि संस्कृतीसाठी ही कंपनी धोकादायक आहे, असे लोक का मानतात? असे प्रश्न ट्वीट संदेशाद्वारे उपस्थित करीत संपादक हितेश शंकर यांनी ‘पांचजन्य’च्या आगामी अंकाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. 

अ‍ॅमेझॉनला भारतीय बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थाही काबीज करायची आहे. या कंपनीमुळे भारतीय संस्कृतीचेही नुकसान होत आहे. ईस्ट इंडिया कंपनीनेही हेच केले होते. – हितेश शंकर, संपादक, पांचजन्य