Artificial Intelligence अर्थात AI आल्यानंतर त्याचा नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याची चर्चा रंगली होती. काहींनी असा परिणाम होणार नाही असेही दावे केले होते. पण आता एआयमुळे नोकऱ्या जात असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक आयटी व इतर बड्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली आहे. त्यात आता Amazon ची भर पडली आहे. अॅमेझॉननं तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं असून त्यानुसार लवकरच एका इ-मेलद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली जाणार असल्याचंही यात म्हटलं आहे.
या वृत्तानुसार, अॅमेझॉनमध्ये आजतागायत झालेली ही सर्वात मोठी नोकरकपात ठरणार आहे. अॅमेझॉनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करणाऱ्या जवळपास ३० हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. आजघडीला अॅमेझॉनमध्ये जवळपास १५ लाख कर्मचारी असून त्यात ३ लाख ५० हजार पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका आकडेवारीनुसार अॅमेझॉनने २०२२ पासून गेल्या चार वर्षांत जवळपास २७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. ही कर्मचारी कपात वेगवेगळ्या प्रमाणात करण्यात आली होती. पण एकाच वेळी ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काय म्हणाले होते अॅमेझॉनचे सीईओ Andy Jassy?
अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेस्सी यांनी करोना काळात अॅमेझॉनसाठी कर्मचारी कपातीचा मोठा कार्यक्रम जाहीर केला होता. कंपनीतील बहुविध पातळ्यांवरील कर्मचाऱ्यांची पद्धत संपुष्टात आणून या पातळ्या कमीत-कमी ठेवण्यावर भर असेल, असंही जेस्सी तेव्हा म्हणाले होते.
AI चा स्वीकार आणि कर्मचाऱ्यांना नकार!
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अँडी जस्सी यांनी एआयमुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, असे सूतोवाच केले होते. या वर्षी जून महिन्यात कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये याचा उल्लेख त्यांनी केला होता. “अनेक ठिकाणी ऑटोमॅटिक प्रक्रिया पद्धती स्थिरस्थावर होत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत एआयमुळे आपल्या एकूण कर्मचारी संख्येत घट होईल”, असं त्यांनी या मेमोमध्ये नमूद केलं होतं.
एआयच्या व्यापक प्रसारामुळे उद्योग जगतात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांवर गदा आली आहे. या वर्षभरात जवळपास २०० टेक कंपन्यांनी तब्बल ९८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. मायक्रोसॉफ्टनं १५ हजार, मेटानं ६००, गुगलनं१ १००, तर इंटेलमधून सर्वाधिक २२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं आहे.
