मारुती सुझुकी, हुंदाई, टोयोटा आणि होंडा अशा अनेक बलाढय़ मोटार कंपन्यांच्या अत्याधुनिक चार चाकी गाडय़ा सध्या मोटार बाजारपेठ काबीज करीत असल्या तरी एके काळी भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली अ‍ॅम्बॅसॅडर मोटार ही जगातील सर्वोत्कृष्ट टॅक्सी म्हणून गणली गेली .
टॉप गीअर या बीबीसी वाहिनीवरील कार्यक्रमातर्फे सवरेत्कृष्ट टॅक्सी स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये सवरेत्कृष्ट टॅक्सीचा मान अ‍ॅम्बॅसॅडर मोटारीला मिळाला. हिंदुस्तान अ‍ॅम्बॅसॅडर ही मोटार या स्पर्धेची निर्विवाद विजेती ठरली आहे, असे इंग्लंडमधील मोटार म्युझियमने पत्रकात म्हटले आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, रशिया यांसारख्या देशांतील मोटारगाडय़ांची स्पर्धा असूनही सवरेत्कृष्ट टॅक्सीचा मान भारतातील अ‍ॅम्बॅसॅडर मोटारीने पटकाविला आहे, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दि हिंदुस्तान अ‍ॅम्बॅसॅडर या नावाने मॉरिस ऑक्सफर्ड ही गाडी भारतात आणण्यात आली आणि लोकप्रिय ठरली. वर्ल्ड ऑफ टॉप गीअरच्या यादीत या गाडीचा समावेश करण्यात आला असला तरी अगदी उद्यासुद्धा ही गाडी रस्त्यावर धावू शकेल इतकी ही गाडी मजबूत आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.
अ‍ॅम्बॅसॅडर मोटारीची निर्मिती १९४८ सालापासून हिंदुस्तान मोटर्स लिमिटेडने हुगळी येथे करण्यास सुरुवात केली. १९८० च्या दशकात भारतीय मोटार बाजारपेठेत मारुती कारचा प्रवेश होण्यापूर्वी अ‍ॅम्बॅसॅडर मोटार ही भारतातील प्रतिष्ठित लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. नंतरच्या काळात जागतिक स्तरावरील बलाढय़ मोटार कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर हळूहळू अ‍ॅम्बॅसॅडर मोटारीची लोकप्रियता घटली. परंतु टॅक्सी प्रकारातील गाडय़ांमध्ये त्यानंतरही सरकारी अधिकारी अ‍ॅम्बॅसॅडर मोटारीचाच वापर करीत आहेत.
अलीकडे या मोटारीसाठीची मागणी घटली आहे. २०१२-१३ सालात फक्त ३ हजार ३९० अ‍ॅम्बॅसॅडर मोटारी विकल्या गेल्या. एप्रिलपासून सुरू झालेल्या सहामाहीत केवळ ७०९ गाडय़ांचीच विक्री झाली आहे.