वॉशिंग्टन, लंडन : भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दोन्ही देशांना संघर्ष न वाढवण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले. परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बुधवारी किंवा गुरुवारी चर्चा करतील असे अमेरिकेकडून सांगण्यात आले.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रुस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, काश्मीरमधील परिस्थितीबाबत अमेरिका दोन्ही देशांशी संपर्क साधत त्यांना संघर्ष वाढवू नका असे आवाहन करत आहे. परराष्ट्रमंत्री रुबियो हे इतर देशांचे नेते आणि परराष्ट्रमंत्र्यांनाही दोन्ही देशांशी या मुद्द्यावर चर्चा करायला सांगत असल्याची माहिती ब्रुस यांनी दिली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश महत्त्वाचे आहेत असे ते म्हणाले.

पाकिस्तान हे वाईट काम अमेरिकेसाठी करत आहे असा दावा पाकिस्तानचे संरक्षण ख्वाजा आसिफ यांनी केला होता. त्याविषयी विचारले असता, ब्रुस यांनी थेट उत्तर दिले नाही.

पर्यटनस्थळांची पाहणी

जम्मू : जम्मूजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वंकष आढावा घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. दोडा-किश्तवार-रामबन भागाचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीधर पाटील यांनी जम्मू-श्रीनगर महामार्गालगत उधमपूर आणि रामबन जिल्ह्यांदरम्यानच्या पटनीटॉप आणि नाथा टॉप तसेच सनासर येथे जाऊन तेथील सुरक्षेची पाहणी केली असे पोलीस प्रवक्त्यांनी सांगितले. या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.

७८६ पाकिस्तानी देशाबाहेर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काढलेल्या आदेशाचे पालन करत गेल्या सहा दिवसांमध्ये ५५ राजनैतिक अधिकाऱ्यांसह ७८६ पाकिस्तानी भारतातून बाहेर गेले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर काही अपवाद करत पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. त्यानुसार वाघा सीमेवरून त्यांना मायदेशी परत पाठवण्यात आले. याचदरम्यान पाकिस्तानातून १,४६५ भारतीय मायदेशी परतले. त्यामध्ये २५ राजनैतिक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच दीर्घ मुदतीचा भारतीय व्हिसा असलेले १५१ पाकिस्तानी नागरिकही वाघा सीमेवरून भारतात आले आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये विमान उड्डाणे रद्द

इस्लामाबाद : ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’ (पीआयए) या सरकारी विमान कंपनीने बुधवारी पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व विमानांचे उड्डाण रद्द केले. सुरक्षेच्या कारणावरून गिलगिट आणि स्कर्डू जाणारी आणि तेथून बाहेर पडणारी विमाने रद्द केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आपल्या हवाई हद्दीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे तसेच सतर्कता वाढवली असल्याचे त्या वृत्तांमध्ये म्हटले आहे.

आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही अनेक पातळ्यांवर भारत आणि पाकिस्तानच्या सरकारच्या संपर्कात आहोत. केवळ परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर नव्हे तर अन्य स्तरांवरही. एक जबाबदार उपाय शोधण्यासाठी आम्ही सर्वांना एकत्र काम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.

टॅमी ब्रुस, प्रवक्तेअमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रिटनकडूनही सामोपचाराचा सल्ला

लंडन : दोन्ही देशांनी शांतता बाळगावी आणि चर्चा करावी असे आवाहन ब्रिटनच्या सरकारने केले आहे. ब्रिटीश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात हुजूर पक्षाचे खासदार गुरिंदर सिंग जोसान यांनी हा तातडीचा मुद्दा उपस्थित केला. पहलगाम हल्ल्यातील दोषींना शिक्षा करण्यासाठी भारताला मदत करण्यात ब्रिटन कोणती भूमिका घेणार असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री हेमिश फाल्कनर म्हणाले की, यासाठी सर्व बाजूंनी, सर्व समुदायांनी शांतता प्रक्रियेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे.