मणिपूरमध्ये महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया आल्या. आता अमेरिकेनेही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच या महिलांना न्याय देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा असल्याचंही अमेरिकेने नमूद केलं. अमेरिकेचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी याबाबत अमेरिकेची भूमिका मांडली. याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.
वेदांत पटेल म्हणाले, “मणिपूरमध्ये दोन महिलांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून आम्हाला धक्का बसला आणि भयभीत झालो. लिंगभेदावर आधारित या हिंसाचारातील पीडित महिलांप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो. तसेच या महिलांना न्याय देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा दर्शवतो.”
हेही वाचा : आधी नग्न करत धिंड काढली, मग सामूहिक बलात्कार; मणिपूरमधील पीडितेचे धक्कादायक खुलासे, म्हणाली…
“हिंसाचारावर शांततापूर्ण आणि सर्वसमावेश उपाययोजनांना प्रोत्सान”
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः महिलांवरील हा हल्ला सभ्य समाजाला लाज वाटावी, असा असल्याचं म्हटलं आहे. या हिंसाचारावर शांततापूर्ण आणि सर्वसमावेश उपाययोजना करण्याला आम्ही प्रोत्साहन देतो. सर्व समुहांमधील नागरिकांचे जीव वाचवणे, त्यांच्या संपत्तीचं संरक्षण करणे आणि त्यांच्या मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रशासनाला प्रोत्साहन देतो,” असंही वेदांत पटेल यांनी नमूद केलं.
दररोज होणाऱ्या पत्रकार परिषदेत पाकिस्तान पत्रकाराने मणिपूर हिंसाचारावर प्रश्न विचारला असता वेंदात पटेल मंगळवारी (२५ जुलै) बोलत होते.
दरम्यान, ३ मे रोजी सुरू झालेल्या मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत १६० अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेकजण जखमी झाले आहेत.