नवी दिल्ली : ‘अमेरिका प्रथम’ हे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण म्हणजे ‘केवळ अमेरिका’ असे नव्हे असे प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी मंगळवारी स्पष्ट केले. नवी दिल्लीती ‘रायसीन डायलॉग’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अमेरिकेची धोरणे आणि भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य केले. अमेरिका प्रथम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत प्रथमसारखेच आहे असे त्या म्हणाल्या.

गॅबार्ड म्हणाल्या की, ‘‘भारताबरोबरचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ट्रम्प प्रशासन उत्सुक आहे. त्यामध्ये हिंद-प्रशांत महासागरी प्रदेशासह विविध आघाड्यांवरील सुरक्षा आव्हानांचा समावेश आहे,’’ असे त्यांनी सांगितले. मात्र, यावेळी त्यांनी भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरलेल्या आयातशुल्काच्या मुद्द्याचा उल्लेख केला नाही. ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून भारतातून येणाऱ्या वस्तूंवर आयातशुल्क लादणार असल्याचे जाहीर केले आहे.

भारत आणि अमेरिकेदरम्यान विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंधांचा विस्तार करण्यास मोठा वाव आहे, असे तुलसी गॅबार्ड यांनी नमूद केले. ट्रम्प हे अमेरिकेला प्राधान्य देत असले तरी याचा अर्थ त्यांनी अन्य देशांबरोबरच्या संबंधांचे महत्त्व मान्य नाही असा घेऊ नये असेही त्यांनी सुचवले.

‘नमस्ते’ आणि ‘जय श्रीकृष्ण’

तुलसी गॅबार्ड या हिंदू धर्माचे पालन करतात, त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्ते’ आणि ‘जय श्रीकृष्ण’ अशी केली. या शब्दांनी आपल्याला दैवी चेतनेची अनुभूती होते असे त्या म्हणाल्या. यामुळे आपण कोणत्याही वंश, वर्ण अथवा धर्माचे असलो तरी एकमेकांशी जोडलेलो असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.