पीटीआय, न्यूयॉर्क/वॉशिंग्टन
इराणची पेट्रोकेमिकल्स उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केल्याप्रकरणी ट्रम्प प्रशासनाने भारतातील सहा कंपन्यांवर निर्बंध लागू केले आहेत. ट्रम्प यांनी जाहीर केल्याप्रमाणे कुठलाही देश किंवा व्यक्ती इराणचे तेल किंवा पेट्रोकेमिकल उत्पादनांची खरेदी करीत असेल, तर अमेरिकेचे निर्बंध त्यावर लागू होतील. अशा कंपन्यांना अमेरिकेबरोबर व्यापार करता येणार नाही.’

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जगभरातील एकूण २० आस्थापनांवर निर्बंधांची घोषणा केली. ती करताना म्हटले आहे, ‘पश्चिम आशियातील तणावात इराण भर घालत आहे. निधी देऊन तेथील अस्थिरता तयार करणाऱ्या घटकांना बळ देत आहे. दहशतवादाला पोसणारा आणि स्वतःच्याच देशातील लोकांवर जबरदस्ती करण्यासाठी कारण ठरणारा हा निधी रोखण्यासाठी अमेरिका काम करीत आहे. भारत, संयुक्त अरब आमिराती, तुर्की, इंडोनेशिया या देशांतील विविध कंपन्या इराणची पेट्रोकेमिकल्स उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करतात. त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले.
चौकट

व्यक्तींवरही निर्बंध, भारतातील तिघांचा समावेश

इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला अली खामेनी यांचे राजकीय सल्लागार अली शामखनी यांचा मुलगा महंमद हुसेन शामखनी याचे समुद्रातून चालणाऱ्या व्यापारावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आहे. यांच्या उद्योगाशी संबंधित ५० हून अधिक व्यक्ती, आस्थापना आणि ५० हून अधिक कार्गो नौकांवर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. यूएईमधील भारताचे नागरिक पंकज पटेल यांच्यासह जेकब कुरिअन आणि अनिल कुमार नायर यांच्यावरही निर्बंध घातले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील या कंपन्यांवर निर्बंध (कंसात गेल्या वर्षभरात खरेदी करण्यात आलेल्या इराणच्या पेट्रोकेमिकल्स उत्पादनांची किंमत )

  • कांचन पॉलीमर्स (१३ लाख डॉलर)
  • अल्केमिकल सॉल्युशन्स (८.४ कोटी डॉलर)
  • रामणिकलाल एस. गोसालिया अँड कंपनी (२.२ कोटी डॉलर)
  • ज्युपिटर डाय केम प्रा. लि. (४.९ कोटी डॉलर)
  • ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स लिमिटेड (५.१ कोटी डॉलर)
  • परसिस्टंट पेट्रोकेम प्रा. लि. (१.४ कोटी डॉलर)