Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची. आतापर्यंत ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लादलेलं आहे. भारतावर देखील तब्बल ५० टक्के आयातशुल्क लादलं आहे. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेत आयात केलेल्या औषधांवर आता २०० टक्के कर लादण्याची योजना डोनाल्ड ट्रम्प आखत आहेत. जर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला तर अमेरिकेत औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तसेच औषधांच्या तुटवड्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. तसेच अमेरिकेने औषधांवर २०० टक्के कर लावल्यास त्याचा भारतावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त एपीच्या हवाल्याने द इकोनॉमिक टाइम्सने दिलं आहे.

आयात केलेल्या औषधांवर ट्रम्प प्रशासनाने जास्त कर लादण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी काही औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत कर जाहीरपणे लादलंही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी ऑटो आणि स्टीलसारख्या वस्तूंवर लागू केलेले आयातशुल्क आता औषधांवर देखील लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनेक कंपन्यांचे औषधं जवळपास दशकांपासून अमेरिकेत शुल्कमुक्त आयात केली जातात. पण ट्रम्प प्रशासनाच्या या नव्या योजनेमुळे औषधांच्या किंमती वाढू शकतात असं तज्ञांचं म्हणणं आहे.

दरम्यान, १९६२ च्या व्यापार विस्तार कायद्याच्या कलम २३२ अंतर्गत अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा आधार घेत औषधांवर कर लादण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावाच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तसेच अमेरिका-युरोप व्यापार आराखड्यात औषधांसह आणखी काही युरोपीयन वस्तूंवर १५ टक्के कर लादला आहे. तसेच ट्रम्प प्रशासन इतर आयातींवर आणखी जास्त कर लावण्याची धमकी देत असल्याची परिस्थिती आहे.

औषधांवर कर लादल्यास काय परिणाम होईल?

आयएनजीचे डायडेरिक स्टॅडिग यांनी गेल्या महिन्यांत म्हटलं होतं की, “टॅरिफमुळे ग्राहकांना सर्वात जास्त त्रास होईल. कारण त्यांना महागाईचा परिणाम जाणवेल. प्रिस्क्रिप्शनसाठी पैसे देताना आणि अप्रत्यक्षपणे विमा प्रीमियमद्वारे देखील ग्राहकांना सर्वात जास्त त्रास होईल. कमी उत्पन्न असलेली कुटुंबे आणि वृद्ध रुग्णांना याचा सर्वाधिक धोका असेल. २५ टक्के टॅरिफमुळेही अमेरिकेतील औषधांच्या किमती १० ते १४ टक्क्यांनी वाढू शकतात. कारण साठा कमी होत जातो.”

भारतावर काय परिणाम होणार?

भारत जागतिक जेनेरिक औषधे मोठ्या प्रमाणात पुरवतो. त्यामुळे अमेरिकेने अशा प्रकारे औषधांवर देखील मोठ्या प्रमाणात कर लादल्यास याचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे. इंडियन फार्मास्युटिकल अलायन्सचे सरचिटणीस सुदर्शन जैन यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, “अमेरिकेच्या तात्काळ शुल्क अंमलबजावणीतून भारतीय औषध उद्योगाला वेगळं करण्यात आलं आहे. कारण अमेरिकेत परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी जेनेरिक औषधे महत्वाची आहेत.” तसेच बसव कॅपिटलचे सह-संस्थापक संदीप पांडे यांनी म्हटलं की, “अमेरिकेच्या औषध आयातीमध्ये भारताचा वाटा अंदाजे ६ टक्के आहे.”