American Airlines Flight evacuated after Boeing aircraft catches fire at Denver airport Video : अमेरिकेतील डेनव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अमेरिकेन एअरलाइन्सच्या विमानाला लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करावे लागल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या AA3023 या विमानातील प्रवाशांना विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच विमानातून बाहेर काढावे लागले. ही घटना शनिवारी घडली. विमानातीस लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याने या विमानाला आग लागली, ज्यामुळे विमानातील प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने खाली उतरवण्यात आले. याचा व्हिडीओ देखील समोर आला असून प्रवाशी खाली उतरल्यानंतर जीव वाचवून पळताना या दिसत आहेत.

अमेरिकन एअरलाइन्सने माहिती देताना सांगितले की, बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान डेनव्हर विमानतळावरून मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करण्याच्या तयारीत होते. यावेळी त्याच्या टायरमध्ये मेन्टन्ससंबंधी समस्या निर्माण झाली.

यानंतर विमानातील सर्व सर्व १७३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. ज्यामध्ये एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर पाच जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले आहेत, असे वृत्त अमेरिकेतील माध्यमांनी दिले आहे.

दरम्यान विमानातून घाबरलेले प्रवासी बाहेर पडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये इव्हॅक्युशन शूट्स (evacuation chutes)मधून प्रवासी घसरत घाली येताना आणि विमानापासून दूर पळताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये विमानातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडताना दिसत आहे.

“विमान टेकऑफ करण्याच्या तयारीत होते आणि ते अचानक थांबले. त्यानंतर धूर येऊ लागला. लोक बाहेर पडण्यासाठी ओरडू लागले आणि त्यानंतर आपत्कालीन दरवाजे उघडले गेले आणि आम्ही स्लाइडवर होतो,” असे एका प्रवाशाने सीबीएस न्यूज कोलोराडोशी बोलताना सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका निवेदनात, अमेरिकन एअरलाइन्सने यांत्रिक बिघाडाबद्दल माहिती दिली आहे. तसेच त्यांनी सांगितले की, या घटनेनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि त्यांना बसने टर्मिनलवर परत नेण्यात आले. “आमच्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही नेहमीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असते,” असे एअरलाइनने म्हटले आहे या घटनेत कोणालीही कोणतीही दुखापत झाली नाही. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) या घटनेची चौकशी करत आहे.