भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही शेजारी देशांना आवश्यक वाटल्यास आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत, असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं. 26 ऑगस्ट रोजी जी 7 परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर 2 आठवड्यांनी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या कोणत्याही मुद्द्यावर तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचं मत ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान मोदी यांनी व्यक्त केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. “काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु दोन आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये जेवढा तणाव होता, तो आता कमी झाला आहे,” असं ट्रम्प यावेळी म्हणाले. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला होता.

यापूर्वीही ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. आपल्याला दोन्ही देशांची साथ हवी आहे. जर दोन्ही देशांची इच्छा असेल तर आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत, असं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. जुलै महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळीही ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं सांगत भारतानं त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता. तसंच जी 7 परिषदेदरम्यानही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे सर्व मुद्दे हे द्विपक्षीय असल्याचे सांगत यामध्ये तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American president donald trump india pakistan tension leass heated 2 weeks ago jud
First published on: 10-09-2019 at 07:44 IST