रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. या युद्धात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित २८ देशंनी युक्रेनला सामरिक मदत करण्याची घोषणा केली आहे. अनेक देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीसाठी निघाल्या देखील आहेत. या पार्श्वभूमीवर हे युद्ध अधिक व्यापक होत असताना आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने गंभीर इशारा दिला आहे. रशियाच्या आक्रमक हालचालींमुळे युक्रेनमधली परिस्थिती गंभीर बनलेली असताना आता अमेरिकेकडून अशा प्रकारचं विधान आल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियन फौजांचा कीववर हल्ला

रशियन फौजांनी आता युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य केलं आहे. कीवमधल्या अनेक इमारती रॉकेट हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र, तरीदेखील युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की कीवमध्येच असून त्यांनी रशियन फौजांचा सामना करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

तिसरं महायुद्ध टाळण्यासाठी निर्बंध?

‘टास’ या रशियन वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी रात्री दिलेल्या निवेदनामध्ये तिसऱ्या जागतिक महायुद्धाचा उल्लेख केला आहे. “जर तिसरं जागतिक महायुद्ध टाळायचं असेल, तर रशियावर निर्बंध घालणं अत्यावश्ययक आहे”, असं बायडेन म्हणाले आहेत.

“तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तिसरं जागतिक महायुद्ध सुरू करा आणि थेट रशियन सैन्याशी आमने-सामने लढा. किंवा दुसरा म्हणजे जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्यांच्या विरोधात वागतोय, त्या देशाला त्यासाठी किंमत चुकवायला लावा”, असं बायडेन म्हणाले आहेत.

“हे निर्बंध कसे असतील त्याचा नेमकं स्वरूप आत्ता सांगणं कठीण आहे. पण मला वाटतं हे आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वात गंभीर निर्बंध असतील. रशियाला या वर्तनासाठी मोठी किंमत चुकवावी लागेल. नजीकच्या भविष्यकाळातही आणि विशेषत: दीर्घकाळात”, असा इशारा देखील जो बायडेन यांनी दिला आहे.

Russia-Ukraine War : “आता जगानं दीर्घकाळ युद्धासाठी तयार राहावं”, फ्रान्सचा गंभीर इशारा; UN सदस्य देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीला!

एक हजार रशियन सैनिक मारल्याचा दावा

गुरुवारी रात्री रशियाने आक्रमण केल्यापासून आतापर्यंत तीन मुलांसह १९८ नागरिक ठार झाले, तर एक हजारहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती युक्रेनच्या आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी दिली. मात्र किती सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. या संघर्षांत एक हजार रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी रशियाने मात्र जीवितहानीची आकडेवारी जाहीर केलेली नाही.

युद्धस्थिती..

– रशियाने युक्रेनचे मेलिटोपोल ताब्यात घेतल्याचे आणि किव्हसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्र मारा केल्याचे वृत्त.

– युक्रेनच्या सैन्याने पश्चिम युक्रेनमधील ल्विव्ह प्रदेशात रशियाचा हल्ला परतवून लावल्याचा ल्विव्हच्या महापौरांचा दावा.

– रशियाच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी युक्रेनला संरक्षणात्मक लष्करी उपकरणे पाठवण्याचा फ्रान्सचा निर्णय.

– व्यापार निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून रशियन कंपनीचे जहाज फ्रेंच सागरी पोलिसांकडून जप्त.

– युक्रेन सरकार उलथवून शांततेच्या वाटाघाटी करण्याचे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे युक्रेनच्या लष्कराला आवाहन.

– कोणत्याही अटी-शर्तीविना युद्धविराम वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे स्पष्टीकरण.

संयुक्त राष्ट्रांत भारत तटस्थ.. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत शुक्रवारी मांडलेल्या ठरावावरील मतदानाच्या वेळी भारत तटस्थ राहिला.  हा ठराव अमेरिकेने मांडला होता. त्यावर रशियाने नकाराधिकार वापरला, तसेच भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिराती मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले. त्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आणि संयुक्त राष्ट्रात ‘‘राजकीय पाठिंबा’’ देण्याची विनंती केली.

मोदी- झेलेन्स्की चर्चा : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धस्थितीची सविस्तर माहिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवित आणि मालमत्ता हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. हिंसाचार थांबवून दोन्ही देशांनी वाटाघाटी करण्याचे आवाहन करण्याबरोबरच शांतता प्रस्थापित करण्यासाठी योगदान देण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American president joe biden warns third world war amid russia attacked kyiv ukrain capital pmw
First published on: 27-02-2022 at 08:24 IST