Assam Tension: आसामच्या शिवसागर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांच्या विषयावरून तणाव निर्माण झाला आहे. बाहेरील लोकांचे लोंढे वाढल्यामुळे येथील स्थानिकांनी त्यांची पारंपरिक ओळख अडचणीत आल्याची भावना व्यक्त केली आहे. तर काही स्थानिक संघटनांनी एका आठवड्याच्या आत जिल्ह्यातील बांगलादेशींनी निघून जावे, असे जाहीर केले आहे. त्यानंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला असून प्रशासन आणि पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून स्थानिक संघटनांच्या नेत्यांना नोटीस बजावल्या आहेत.

सोमवारी (दि. २६ ऑगस्ट) शिवसागर जिल्ह्यातील मुख्य शहरातून पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला. तसेच स्थानिक संघटनांच्या २७ नेत्यांना शिवसागरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १२६ नुसार नोटीस बजावली. शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही नोटीस बजावली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे वाचा >> आसाममध्ये जोरदार निदर्शने; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मागच्या दोन आठवड्यात शिवसागर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर नेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. स्पीकर लावून बेकायदेशीररित्या जमावाला गोळा करणे, तसेच शिवसागर जिल्ह्यातील दुकान, बाजार बंद ठेवण्याचे आवाहन करणे, तसेच एका समुदायाकडून दुसऱ्या अल्पसंख्याक समुदायाविरोधात चिथावणीखोर विधान करून शांततेचा भंग करू नये, असे या नोटीशीत सांगण्यात आले आहे. शिवसागर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक शुभ्रज्योती बोरा म्हणाल्या की, आम्ही जिल्ह्यात पुढचे १० ते १५ दिवस फ्लॅग मार्च काढणार आहोत.

सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर आसाममध्ये तणाव

आसामच्या नागाव जिल्ह्यात २२ ऑगस्ट रोजी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर शिवसागरसह अनेक जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन आरोपीपैकी तफज्जूल इस्लाम याला दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली होती. मात्र पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला.

२२ ऑगस्टच्या घटनेनंतर मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सर्मा म्हणाले की, ही घटना येथील मूळ रहिवाशांवर आक्रमण करणारी आहे. त्यामुळे पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

हे ही वाचा >> Assam Row: आसाममध्ये बदलापूरसारखा उद्रेक; अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणात मारवाडी समाज लक्ष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारवाडी समाजाविरोधातही स्थानिकांचे आंदोलन

तत्पूर्वी शिवसागर जिल्ह्यातच १३ ऑगस्ट रोजी एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्थानिक नागरिक आणि व्यापारी मारवाडी समाज यांच्यात संघर्ष पेटला होता. या घटनेतील आरोपी मारवाडी समाजातील असल्यामुळे आसाम राष्ट्रवादी संघटनेने मारवाडी समाजाविरोधात मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला होता. तसेच शहरातील मारवाडी समाजाच्या दुकानांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर मारवाडी समाजाने एकत्र येऊन स्थानिक नागरिकांची माफी मागितली, तसेच राज्याचे मंत्री रनोज पेगू यांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा टाकण्यात आला.