Amit Shah slams Congress in Bihar NDA Rally : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून आता ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये प्रचाराचा आजचा (रविवार, ९ नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बिहारमधील सासाराम विधानसभा मतदारसंघात एनडीएने आयोजित केलेल्या प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

अमित शाह म्हणाले, पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानावरून मी ठामपणे सांगतो की या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसच्या महागठबंधनला मोठा पराभव स्वीकारावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे.

अमित शाहांची राजद व काँग्रेसवर टीका

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “लोकांचा कौल स्पष्ट आहे. राजद व काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. राहुल गांधी (काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते) व तेजस्वी यादव (राजद नेते तथा महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार) घुसखोरांच्या संरक्षणासाठी एक पदयात्रा काढली होती. या लोकांनी घुसखोरांना आपली मतपेढी बनवलं आहे. त्यांची बिहारला ‘इन्फिट्रेटर कॉरिडोर’ बनवण्याची योजना आहे. परंतु, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे की बिहार ‘इंडस्ट्रियल कॉरिडोर’ व्हावं.

“एनडीएकडे पाच पांडव”

“पुढच्या पाच वर्षांमध्ये बिहार एक विकसित राज्य झालेलं तुम्हाला दिसेल. एनडीएकडे पाच पांडव आहेत, जे एकजूट होऊन निवडणूक लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारला नक्षलवादापासून मुक्त केलं आहे आणि राज्यात विकासाची मुहुर्तमेढ रोवली आहे.”

काँग्रेसने एका दलित नेत्याला पंतप्रधान होऊ दिलं नाही : शाह

केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबू जगजीवन राम यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “बाबू जगजीवन राम पंतप्रधान होऊ शकले असते. परंतु, काँग्रेस पक्षाने त्यांना अडवलं. काँग्रेसने दलितांवर नेहमीच अन्याय केला आहे. काँग्रेसने एका दलित नेत्याला पंतप्रधान होऊ दिलं नाही.”

अमित शाहांचा लालू प्रसाद यादव यांना टोला

अमित शाह म्हणाले, “आमच्या सरकारने जीविका दिदी योजनेच्या माध्यमातून बिहारच्या महिलांच्या खात्यावर १० हजार रुपये जमा केले आहेत. पंरतु, लालू प्रसाद यादव खोटा प्रचार करत आहेत की सरकार हे पैसे परत घेईल. लालू प्रसाद यादव यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की त्यांच्या पुढच्या तीन पिढ्या देखील ही रक्कम परत घेऊ शकत नाही.”