केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचं निधन झालं आहे. मुबईतल्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपाच्या एक वरिष्ठ पदाधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. राजेश्वरीबेन यांच्या निधनाचं वृत्त कळताच अमित शाह यांनी त्यांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. राजेश्वरीबेन यांचं वय ६५ वर्षे इतकं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार चालू होते. राजेश्वरीबेन यांचं पार्थिव अहमदाबादला नेलं जात असून सायंकाळी थलतेज स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

अहमदाबादमधील एका रुग्णालयात राजेश्वरीबेन यांच्यावर फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु, त्यानंतरदेखील त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांना मुंबईतल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. अमित शाह यांनी बहिणीवरील उपचारांसंदर्भात गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतल्या एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेतली होती.

हे ही वाचा >> राम मंदिर सोहळ्यात चार शंकराचार्यांचा सहभाग का नाही?, स्वामी निश्चलानंद म्हणाले, “कुठलाही अहंकार नाही, मात्र…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाह हे आज सकाळपासून अहमदाबादेत आहेत. ते भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मकर संक्रात साजरी करत असताना त्यांना बहिणीच्या निधनाचं वृत्त समजलं. त्यामुळे त्यांनी बनासकांटा आणि गांधीनगरमधील दोन नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. अमित शाह हे बनासकांठामधील देवदार गावातील बनास डेअरीच्या वेगवेगळ्या योजनांचं उद्घाटन करणार होते. तर दुपारी गांधीनगरमध्ये राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातील वेगवेगळ्या योजनांचं उद्घाटन करणार होते. परंतु, आता अमित शाह या कार्यक्रमांना जाणार नाहीत.