Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान जी चर्चा सुरु आहे ती अंतिम टप्प्यात पोहचली असून येत्या काही आठवड्यांमध्ये चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं आहे. भारत सरकार अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, त्या दृष्टीने आम्ही पावलंही उचलत आहोत असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं. FE Best Banks Awards 2025 या कार्यक्रमात अमित शाह यांची उपस्थिती होती. त्यावेळी अमित शाह यांनी हे विधान केलं आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

भारत आणि अमेरिका यांच्यातल्या चर्चेबाबत काय म्हणाले अमित शाह?

“भारत आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. भारत सरकारने अर्थव्यवस्थेच्या गतीबाबत महत्त्वाची पावलं उचलली आहेत. येत्या काही आठवड्यांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या कराराची माहिती सगळ्यांसमोर येण्याची आणि चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.”

कच्च्या तेलाच्या खरेदी बाबत काय म्हणाले अमित शाह?

कच्चं तेल आयात करण्याचा प्रश्न विचारला असता अमित शाह म्हणाले फक्त रशियाच नाही तर जिथून स्वस्त दरांमध्ये कच्चं तेल मिळेल तिथून भारत ते खरेदी करणार आहे. रशियातूनच स्वस्त कच्चं तेल विकत घ्यायचं आहे असा मुद्दा नाही तर ज्या देशातून कच्चं तेल मिळेल ते भारत विकत घेणार आहे असंही अमित शाह म्हणाले.

GST सुधारणांवरुन विरोधी पक्षांवर टीका

जीएसटी सुधारणांबाबत बोलत असताना अमित शाह यांनी कांग्रेसवर टीका केली. “राहुल गांधींच्या पक्षाचे अनेक लोक म्हणत आहेत जीएसटी ही त्यांची कल्पना होती. जर त्यांची ही कल्पना होती तर मग त्यांनी जीएसटी लागू का केला नाही? आता ते सांगतात की राज्यांनी आम्हाला विरोध दर्शवला. मात्र यामागचं सत्य हे आहे की त्यांचं सरकार राज्यांना विकासाची खात्री देऊ शकलं नाही. मोदी सरकार आल्यानंतर मोदींनी राज्यांना १४ टक्के विकासदराची हमी दिली.” असं अमित शाह म्हणाले तसंच जीएसटीतल्या सुधारणा हे सरकारचं महत्त्वाचं पाऊल आहे असंही अमित शाह म्हणाले.

बँकांनाही दिला महत्त्वाचा सल्ला

बँकिंग अवॉर्ड्सच्या या कार्यक्रमात अमित शाह यांनी भारतीय बँकांनाही महत्त्वाचा सल्ला दिला. अमित शाह म्हणाले, “भारतीय बँकांनी आता मोठ्या प्रमाणावर बदल करणं अपेक्षित आहे. भारतीय बँका या जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज झाल्या पाहिजेत अशी आशा आम्हाला आहे. “