Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरात होणाऱ्या आंदोलनांसंदर्भात मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिल्याचं सांगितलं जात आहे. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPR&D) कडे हे काम सोपवण्यात आलं असून त्यासाठी स्वातंत्र्यापासून, विशेषत: १९७४ सालापासून झालेल्या आंदोलनांचा अभ्यास करण्याचेही निर्देश अमित शाह यांनी दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे यात आंदोलनांमागचं आर्थिक गणित आणि पाठिशी असणारे हात याचाही अभ्यास केला जाणार आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या दोन दिवसीय परिषदेमध्ये देशाच्या सुरक्षेसंदर्भातील विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. याच परिषदेमध्ये अमित शाह यांनी आंदोलनांचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं जात आहे.
“आंदोलनांमागे कोणत्या शक्ती होत्या, याचा अभ्यास होणार”
“या काळात झालेल्या सर्व आंदोलनांची कारणं, निश्चित पद्धती आणि परिणाम यांचा अभ्यास करण्याचे आदेश BPR&D ला देण्यात आले आहेत. विशेषत: या आंदोलनांच्या मागे नेमक्या कोणत्या शक्ती काम करत होत्या, हेदेखील तपासण्यास सांगितलं आहे”, अशी माहिती सरकारमधील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली. “भविष्यात विशिष्ट अंतस्थ हेतूंसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांना आळा बसावा म्हणून या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारावर मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत”, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.
आंदोलनांच्या अभ्यासासाठी विशिष्ट पथक
दरम्यान, अमित शाह यांच्या आदेशांनुसार, BPR&D vs या आंदोलनांच्या अभ्यासासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गतच विशिष्ट पथक नियुक्त करण्याची तयारी सुरू केली आहे. हे पथक राज्य पोलीस दलाच्या सहकार्याने जुन्या प्रकरणांची कागदपत्रे, अहवाल तपासण्याचे काम करेल.
ED देखील आंदोलनांचा अभ्यास करणार
अमित शाह यांनी ईडी, आर्थिक माहिती विभाग, सीबीडीटी अशा संस्थांचीही मदत घेण्याचे निर्देश BPR&D ला दिले आहेत. यातून या आंदोलनांच्या आर्थिक बाजूचाही अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती एका वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली.