भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्तमान अध्यक्ष अमित शहा यांची बिनविरोध फेरनिवड झाली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी याबाबतची आज घोषणा केली.  भाजपाध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत शहा यांच्या विरोधात कोणीच उभे न राहिल्याने त्यांची एकमताने आणि बिनविरोध निवड झाली.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज दुपारी पक्षाच्या मुख्यालयात निवडणूक पार पडली. पक्षाध्यक्षपदासाठी अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र, त्यांच्या विरोधात कुणाचाही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील तीन वर्षांसाठी शहा यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी भाजपचे अध्यक्षपद सोडले होते. त्यामुळे पदाची जबाबदारी शाह यांच्या खांद्यावर देण्यात आली होती व ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत होते. दरम्यान, भाजपच्या अध्यक्षपदी अमित शहा यांची फेरनिवड होत असताना पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा हे मात्र या कार्यक्रमापासून दूरच असल्याचे पहायला मिळाले.