Amit Shah आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार भाषण करत ऑपरेशन सिंदूरची कारवाई आणि ऑपरेशन महादेवची कारवाई कशी झाली ते सांगितलं. यावेळी त्यांनी १९७१ मधला एक प्रसंग सांगितला. ज्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांन इंदिरा गांधींना शिमला कराराच्या आडून कसं मूर्ख बनवलं तो प्रसंग सांगितला. एवढंच नाही तर फिल्ड मार्शल सॅम माणिक शॉ यांच्या एका वाक्याची आठवणही अमित शाह यांनी काँग्रेसला करुन दिली.
अमित शाह काय म्हणाले?
१९७१ च्या युद्धाचाही उल्लेख मी करतो आहे. १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. भारताला शतकानुशतकं अभिमान वाटेल अशीच ती घटना होती. प्रत्येकाला या विजयाबाबत अभिमान आहे. पण काय घडलं ते तुम्हाला सांगतो. विजयाच्या जल्लोषात आपण काय विसरलो ते सांगतो. ९३ हजार युद्ध कैदी आपल्या ताब्यात होते आणि पाकिस्तानचं १५ हजार वर्ग किमी क्षेत्रफळ आपल्या ताब्यात होतं. ९३ हजार युद्धबंदी म्हणजे पाकिस्तानच्या त्यावेळच्या पाकिस्तानच्या सैन्यातले ४२ टक्के आपल्याकडे होते. पण शिमला करार झाला आणि पाकव्याप्त काश्मीर मागायलाच विसरले. जर त्यावेळी पाकव्याप्त काश्मीर मागितलं असतं तर ही वेळच आली नसती. १५ हजार वर्ग किमीचं क्षेत्र जे आपण जिंकल होतं ती जमीनही परत देऊन टाकली.
सॅम माणेक शॉ इंदिरा गांधींना काय म्हणाले होते? अमित शाह यांनी सांगितलं
पाकिस्तान नरसंहारासाठी युद्ध न्यायाधिकरण स्थापन होईल अशी घोषणा झाली होती मात्र ते झालं नाही. १५० अधिकाऱ्यांवर खटला भरणार होता पण भुट्टो इंदिरा गांधींच्या डोळ्यांदेखत त्या अधिकाऱ्यांना सोडवून घेऊन गेले. मी आज तुम्हाला जनरल माणेक शॉ यांचं एक वाक्य सांगतो, भुट्टोने भारताच्या नेतृत्वाला मूर्ख बनवलं असं सॅम माणेक शॉ म्हणाले होते. त्यांचे शब्द सांगतो, “I told Her (Indira Gandhi) That He ( Zulfiqar Ali Bhutto) Has made a Monkey out of You” हे माझं वाक्य नाही हे फिल्ड मार्शल माणेक शॉ म्हणाले आहेत. आता हे काँग्रेसचे लोक आम्हाला शिकवत आहेत. हे नाही केलं, ते नाही केलं,अमकं केलं नाही ते केलं नाही. तुम्ही तर पाकिस्तानला क्लीन चिट देणारे लोक आहात तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार काय? असा उल्लेख आज अमित शाह यांनी त्यांच्या ऑपरेशन सिंदूर बाबतच्या भाषणात केला. माझ्या बोलण्यावर तुम्ही आरडाओरडा करत आहात पण त्यामुळे सत्य बदलणार नाही असंही अमित शाह विरोधकांना म्हणाले.
पाकिस्तानची निर्मिती ही काँग्रेसची घोडचूक आहे-अमित शाह
पाकिस्तानची निर्मिती ही काँग्रेसची घोडचूक आहे. कारण फाळणी स्वीकारली नसती तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती असंही अमित शाह म्हणाले आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. २००२ मध्ये दहशतवाद संपवण्यासाठी एनडीए, भाजपा सरकारने पोटाचा कायदा आणला होता. पोटा कायद्याला काँग्रेसने विरोध केला. नाईलाजाने तेव्हा संयुक्त सत्र बोलवण्यात आलं त्यात तो कायदा संमत झाला. देश हे कधीही विसरु शकत नाही. पोटा कायद्याला विरोध करुन तुम्ही कुणाचा बचाव करु पाहात होतात? व्होट बँक वाचवण्यासाठी तुम्हाला दहशतवाद्यांना वाचवायचं होतं ना? २००४ ला मनमोहन आणि सोनिया गांधींचं सरकार आलं, त्यानंतर काँग्रेसने पहिल्या कॅबिनेटमध्ये पोटा कायदा रद्द करण्यात आला. कुणाच्या हितासाठी हा निर्णय घेतला? याचं उत्तर द्या असंही अमित शाह म्हणाले.